उपेंद्र कुशवाह यांना मोठा दणका, जेडीयूमध्ये सहभागी होणार शेखर-पासवान!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:09 PM2018-11-11T19:09:24+5:302018-11-11T19:11:14+5:30
बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत.
पाटणा- बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत. या दोघांनी जर नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. रविवारी दुपारी हरलाखीचे आरएलएसपी आमदार 7 सर्क्युलर रोडवर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी जवळपास 45 मिनिटे प्रशांत किशोर यांच्याबरोबर चर्चा केली. तेव्हा नितीश कुमारही तिकडे पोहोचले.
सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे उपेंद्र कुशवाह यांची साथ सोडू शकतात. तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील शाब्दिक चकमकीवर लोक जनशक्ती पक्षाच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दोघांनाही एनडीएच्या मर्यादेची जाणीव करून दिली होती. नितीश कुमार काहीही चुकीचं बोलतील, असं वाटत नसल्याचं चिराग पासवान म्हणाले आहेत. तसेच उपेंद्र कुशवाह यांनाही हा वाद वाढवू नका, असं सांगितलं आहे.
उपेंद्र कुशवाह आणि नितीश कुमार यांच्यामध्ये नीच या शब्दावरून वाद झाला होता. तसेच बिहारमधल्या जागावाटपावरूनही दोघांमध्ये मतभेद आहेत. याच दरम्यान राजकारणातले चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी उपेंद्र कुशवाह यांना झटका दिला आहे. तसेच येत्या मंत्रिमंडळ विस्तारातही या आमदारांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.