CoronaVirus News: कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास पगार नाही; सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 11:40 AM2021-04-22T11:40:18+5:302021-04-22T11:42:43+5:30
CoronaVirus News: लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली शक्कल; प्रशासकीय वर्तुळात पत्राची चर्चा
पाटणा: बिहारमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात दररोज १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिहारच्या गया जिल्ह्यात एका अधिकाऱ्याच्या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाऱ्यानं पगाराची मदत घेतली आहे. कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार हवा असल्यास त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असं गया आणि बेगुसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रांची सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले! गेल्या 24 तासांत 3,14,835 रुग्ण सापडले; टेन्शन वाढले
गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी २० एप्रिलला एक पत्र जारी केलं आहे. मार्च महिन्याचा पगार हवा असल्यास लसीचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं सादर करावी लागतील, याची माहिती आधीच देण्यात आली होती. ही प्रमाणपत्रं जमा केल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल, याबद्दल पूर्वसूचना देण्यात आली होती, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे.
तीन दिवसांपासून घरात पडून होता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह; शेजारी पोहोचताच...
काही कर्मचारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच पगार घेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे आदेशाचं उल्लंघन होत आहे. कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं द्यावीत. त्यानंतरच त्यांना वेतन दिलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय मृत्यूदरातही २० टक्क्यांची वाढ झाली आहे. पाटण्यातील अनेक रुग्णालयांमधील बेड्सची कमतरता आहे. याशिवाय रुग्णांना ऑक्सिजनचादेखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.