Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:23 AM2021-06-10T11:23:07+5:302021-06-10T11:24:07+5:30
Coronavirus: बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे.
पाटणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला. कोरोनामुळे होणारे मृत्यूही चिंतेत भर टाकणारे होते. नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे होणारे मृत्यूही नवीन उच्चांक गाठणारे ठरले. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप केला जात होता. यातच आता बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे तब्बल ९ हजार ३७५ जणांनी आपले प्राण गमावले अशी माहिती मिळाली आहे. (bihar govt itself admitted that deaths due to corona were hidden)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे बिहारमध्येही मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात होते. पाटणा उच्च न्यायालयानेही अनेकदा सरकारी आकड्यांवर आक्षेप नोंदवत बिहार सरकारला फटकारले होते. गंगा नदीच्या किनारी मिळणारे मृतदेह आणि अंत्यसंस्कारांचा आकडा यात तफावत असल्याचे सातत्याने म्हटले जात होते. अखेर बिहार सरकारच्या आरोग्य विभानाने यासंदर्भातील कबुली देत मोठा खुलासा केला आहे.
कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत बिहारमध्ये ५ हजार ४२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र, सदर आकडेवारी चुकीची असून, वास्तविक पाहता, याच कालावधीत बिहारमध्ये तब्बल ९ हजार ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १८ मे रोजी सरकारच्यावतीने कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीबाबत तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ०१ लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशभरात बुधवारी दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.