'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:58 PM2022-12-15T13:58:25+5:302022-12-15T14:24:52+5:30

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

Bihar Hooch tragedy | CM Nitish Kumar | If someone consumes liquor, they will die, says Bihar CM Nitish Kumar | 'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

googlenewsNext

पाटणा: बिहारच्या छपरा जिल्ह्यात बनावट/विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, आतापर्यंत 47 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजब विधान करून सर्वांनाच चकीत केले आहे. गुरुवारी विधानसभेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ''जो दारू पितो तो नक्कीच मरतो. बिहारमध्ये बनावट दारूमुळे मृत्यू होणे ही नवीन गोष्ट नाही. देशभरातील लोक बनावट दारूमुळे मरतात. विरोधक केवळ दारूच्या मुद्यावर राजकारण करत आहेत. बिहारमध्ये दारूबंदी नसतानाही इतर राज्यात लोक मरायचे. लोकांनी स्वतः सावध राहावे. दारू वाईट आहे आणि त्याचे सेवन करू नये.''

दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला
सीएम नितीश कुमार पुढे म्हणाले की, ''दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारू सोडली, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. मी अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहे की, दोषींना पकडावे, गरिबांना पकडू नये. दारू बनवणाऱ्या आणि दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करावी.''

दारू सोडणाऱ्यांना एक लाख रुपये देणार 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''गेल्या वेळी जेव्हा बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाला होता तेव्हा कोणीतरी त्यांना नुकसान भरपाई द्या, असे म्हटले होते. भरपाई कशासाठी? जर एखादा दारू प्यायला, तर तो मरेलच. उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यावर शोक व्यक्त करायला हवा, त्या ठिकाणांना भेटी देऊन लोकांना समजावून सांगायला हवे. आमचे सरकार लोकांना दुसरे काम सुरू करण्यासाठी एक लाख रुपये देण्यास तयार'' असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता जागृत होत नाही
दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवर नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ''हे बिहारचे दुर्दैव आहे. बिहारमध्ये दारू धोरण लागू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण मुख्यमंत्र्यांची सहानुभूती जागृत होत नाही आणि कुणी सभागृहात आवाज उठवला की, कुणालाही अपेक्षित नव्हते, अशी वागणूक दिली जाते.'' यासोबतच माजी राज्यसभा खासदार आरसीपी सिंह म्हणाले की, ''नितीश कुमार देशाचे पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर बिहारचा बळी देत ​​आहेत. 2020 नंतर नितीश कुमार केवळ विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.''

Web Title: Bihar Hooch tragedy | CM Nitish Kumar | If someone consumes liquor, they will die, says Bihar CM Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.