रुग्णालय की मत्सालय? पुरामुळे आयसीयूमध्ये पोहोचले मासे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:51 PM2018-07-30T12:51:51+5:302018-07-30T12:54:10+5:30
रुग्णालयातील अनेक विभागांमध्ये गुडघाभर पाणी
पाटणा : मुसळधार पावसामुळे बिहारची दैना झाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. याशिवाय वैद्यकीय सेवेचेही तीन-तेरा वाजले आहेत. राज्यातील महत्त्वाचं रुग्णालय असलेल्या नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पाणी साचलं आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये तर गुडघाभर पाणी साचल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. आयसीयूमध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मात्र या रुग्णालयात आयसीयूमध्ये चक्क मासे पोहताना दिसत आहेत.
नालंदा वैद्यकीय महाविद्यायात पूर्व बिहारमधून हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र पावसामुळे या रुग्णालयात पाणी साचल्यानं रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. रुग्णालय 'जलयुक्त' झाल्यानं विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. 'बिहारमधील दुसरं मोठं रुग्णालय असलेल्या एनएमसीएचला मत्सालयाचं स्वरुप आलं आहे. हा इंद्रदेवाचा स्टंट आहे असं संयुक्त जनता दलाकडून जाहीर केलं जाणार नाही, अशी आशा आहे. सरकारची धोरणं 14 वर्षांपासून चुकत आहेत, हे स्वत: देवसुद्धा निदर्शनास आणून देत आहे,' असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Nitish Kumar’s model of development. ICU of NMCH is swimming in drain water, fishes seen in ICU. Mind you, you cant question Nitish Kumar as his conscience is fast asleep and snoring with BJP. https://t.co/XucX31lZvb
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 29, 2018
नालंदा वैद्यकीय रुग्णालयात दररोज 2 हजार रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र सध्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णांना सेवा पुरवणं अवघड जातं आहे. रुग्णालयातील अनेक विभागांमध्ये गुडघाभर पाणी आहे. अनेक मशीन्समध्ये पाणी गेल्यानं त्या बंद आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. आयसीयूमध्ये स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मात्र या विभागात दूषित पाणी साचलं आहे. त्यामध्ये मासे पोहताना दिसत आहेत.