बापरे ! रेल्वे स्टेशनवर आढळले 34 मानवी सांगाडे आणि 16 कवट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:56 AM2018-11-28T11:56:01+5:302018-11-28T11:59:53+5:30
छपरा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
पाटणा : छपरा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, छपरा जंक्शनहून अटक करण्यात आलेल्या संजय प्रसाद (वय 29 वर्ष) नावाच्या व्यक्तीकडून मानवी सांगाडे ताब्यात घेण्यात आले आहेत. अहमद यांनी सांगितले की, प्रसादकडून 16 कवट्या आणि 34 सांगाडे जप्त करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडून भुतानचे चलन, वेगवेगळ्या देशांतील एटीएम कार्ड आणि एक परदेशी सिम कार्डदेखील जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असताना संजय प्रसादनं सांगितले की, उत्तर प्रदेशातील बलिया येथून त्यानं सांगाडे विकत घेतले आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीहून भुतानच्या दिशेनं तो प्रवास करत होता. वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी मानवी सांगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीत संजय प्रसादचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी संजयची कारागृहात पाठवणी केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील एका घरामध्ये पोलिसांना 18 मानवी सांगाडे आढळले होते. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.