बिहारच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी चिराग पासवान यांचा 'बिहारी अवतार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:51 AM2020-02-28T11:51:24+5:302020-02-28T12:11:10+5:30
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं होतं. त्याचाच कित्ता आता चिराग पासवान गिरवत आहेत.
नवी दिल्ली - बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र येथील राजकारण आताच तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आपलं संघटन मजबूत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आपल्या मोहिमेला सोशल मीडियावरूनच सुरुवात केली आहे.
चिराग पासवान यांनी ट्विटरवरील आपल्या अकाउंटचे नाव बदलले आहे. त्यांनी 'युवा बिहारी चिराग पासवान' असं नाव धारण केलं आहे. लोक जनशक्ती पक्षाने आधीच 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' हा नारा देऊन यात्रा काढली आहे. वैशाली आणि मुजफ्फरपूर येथून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप 14 एप्रिल रोजी गांधी मैदान येथे होणार आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जात आहे.
चिराग पासवान यांनी ट्विटरवरील आपलं नाव बदलून आपण बिहारमधील युवकांसाठी काम करणार असल्याचा संदेश दिला आहे. निवडणुकीसाठी संपूर्ण रोडमॅप तयार केला असल्याचे चिराग यांनी स्पष्ट केले. याआधी लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं होतं. त्याचाच कित्ता आता चिराग पासवान गिरवत आहेत.
चिराग यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील राज्यात 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढली होती. तर मुख्यमंत्री नितीश कुमार देखील जनता दल युनायटेडचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.