बिहारमध्ये सोन्याबरोबरच बहुमूल्य खनिजांचे भांडार; जमुई अन् औरंगाबाद खनिजांनी ओतप्रोत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:59 AM2022-05-30T06:59:59+5:302022-05-30T07:00:07+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात पीरपैंती व कहलगावाच्या परिसरात कोळशाचा ग्रेड जी-१२ उपलब्ध आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये सोन्याबरोबरच निकेल, क्रोमियम, पोटॅश व कोळशाचे भांडार आहे. जमुईमध्ये सोने, औरंगाबादमध्ये निकेल व क्रोमियम, गयामध्ये पोटॅश व भागलपूरमध्ये कोळशाचे मोठे साठे आहेत. सोन्याचा मोठा साठा सापडल्यामुळे जमुई जिल्हा पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आला आहे. जमुईच्या करमटिया, सोनो या निर्जन ठिकाणी हा सोन्याचा साठा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात पीरपैंती व कहलगावाच्या परिसरात कोळशाचा ग्रेड जी-१२ उपलब्ध आहे. येथे ८५० दशलक्ष टन कोळसा असल्याचा अंदाज आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दोन टप्प्यांत केलेल्या सर्वेक्षणात जमुई जिल्ह्याच्या मंजोष गावात मॅग्नेटाइटचे साठे मिळाले आहेत. त्याच्या उत्खननातून संगमरवरासारखा दगड मिळतो.
जमुई जिल्ह्यात दीड दशकापूर्वी सोन्याच्या साठ्याबाबत उत्खनन झाले होते. परंतु सोन्याचे प्रमाण कमी आढळल्याने हा प्रकल्प अर्ध्यावर सोडण्यात आला होता; परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सोन्याचे उत्खनन स्वस्तात होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमुई जिल्ह्यात करमाटिया, झाझा व सोनो हा परिसर खनिजांनी ओतप्रोत भरलेला आहे. येथे सोन्याच्या शोधासाठी १५-१६ वर्षांपूर्वी कोलकाता येथून एक पथक आले होते. त्यांनी करमटियामध्ये सोन्याचे साठे असल्याचे म्हटले होते. सरकारने १९८२ मध्ये हा परिसर संरक्षित जाहीर केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी खनन झाले होते.