"रामदेव बाबांचं 'लष्कर'शी कनेक्शन, तर मोदींना पाकिस्तानची भीती..."; जदयू नेत्याचं खळबळजनक विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:37 PM2023-02-13T14:37:50+5:302023-02-13T14:39:28+5:30
वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे जदयूचे नेते गुलाम रसू बलियावी यांच्या आणखी एका विधानानं खळबळ उडाली आहे.
वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे जदयूचे नेते गुलाम रसू बलियावी यांच्या आणखी एका विधानानं खळबळ उडाली आहे. बिहारमधील नवादा येथे जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गुलाम रसूल बलियावी यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले आहे. नवादा येथे मार्कजी इदारा-ए-शरियाने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना रसूल बलियावी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी बाबा रामदेव आणि बाबा बागेश्वर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
बाबा रामदेव हे भारतीय नाहीत, त्यांचे पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे, असं विधान रसूल बलियावी यांनी केलं आहे. बाबांकडे एवढी संपत्ती कुठून आली, याचा तपास व्हायला हवा, असे बलियावी म्हणाले. दुसरीकडे, बाबा बागेश्वरबाबत यांच्यावर टीका करताना चांगले कपडे घालून आणि मेकअप करून कोणीही आपल्या देशाची दिशाभूल करू शकत नाही, असं बलियावी म्हणाले. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत बोलणाऱ्या बाबा बागेश्वर यांच्या वक्तव्यावर बलियावी म्हणाले की, "तो कोण आहे, काय आहे हे मला माहीत नाही. आम्हाला त्याबद्दल माहिती नाही. पण, आपल्याला देशाची घटना आणि न्यायालय माहीत आहे आणि अशा तोतयागिरी करणाऱ्यांना आपल्या देशात स्थान नाही"
सैन्यात मुस्लिमांना ३० टक्के स्थान द्यावं
बलियावी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला उत्तर देण्याची भीती वाटत असेल तर लष्करात ३० टक्के मुस्लिमांना स्थान द्यावं. पाकिस्तान मग कधीच भारताला डोळे दाखवणार नाही. जेव्हा पाकिस्तान भारताला क्षेपणास्त्रे दाखवत होता, तेव्हा नागपूरचे एकही बाबा उत्तर द्यायला आले नव्हते, तर फक्त एका मुस्लिमाचा मुलगा पुढे आला होता, ज्याचे नाव होते एपीजे अब्दुल कलाम. त्यांनीच पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं", असं रसूल बलियावी म्हणाले.