तेजस एक्स्प्रेसमध्ये अंडरवेयरमध्ये फिरत होते आमदार; प्रवाशांनी रोखताच घातला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 11:11 AM2021-09-03T11:11:11+5:302021-09-03T11:12:50+5:30
प्रवाशांनी रोखताच आमदारानं घातला वाद; पोलीस बोलावण्याची वेळ आली
पाटणा: बिहारची राजधानी पाटण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल अंडरवेअरवर फिरत असल्याचे दिसून आलं आहे. गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर, बनियानवर फिरत होते. गोपाल यांना अशा अवस्थेत पाहून रेल्वेच्या डब्यात असलेल्या काही प्रवाशांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर मंडल यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ झाला. ट्रेनमध्ये तैनात असलेलं आरपीएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी आमदार मंडल यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
गोपाल मंडल आणि प्रवासी यांच्यात वाद झाला, त्यावेळी तेजस एक्स्प्रेसनं दिलदारनगर रेल्वे स्थानक ओलांडलं होतं. आरपीएफनं घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे. तेजस राजधानी एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या सीट नंबर १३, १४ आणि १५ वरून मंडल प्रवास करत होते. तर जहानाबादमध्ये वास्तव्यास असलेले प्रल्हाद पासवान त्यांच्या कुटुंबासोबत ए-१ कोचच्या सीट नंबर २२, २३ वर होते. दोघांचे तिकीट पाटणा ते नवी दिल्लीपर्यंत होतं.
अंडरवेअर, बनियानवर टॉयलेटला गेले होते मंडल
जेडीयूचे आमदार गोपाल मंडल अंडरवेअर आणि बनियानवर टॉयलेटला गेले होते. ते टॉयलेटवरून त्यांच्या आसनाकडे येत असताना प्रल्हाद यांनी आक्षेप घेतला. आसपास महिला प्रवासी आहेत याचं भान ठेवा, असं प्रल्हाद यांनी सांगितलं. मात्र गोपाल मंडल ऐकायला तयार नव्हते. त्यांनी उलट वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानं ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आरपीएफ टीमनं पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शनवरील रेल्वे पोलिसांना सूचना दिली.