Bihar Liquor Ban: बिहारचे हायटेक पोलीस, हेलिकॉप्टरमधून शोधणार राज्यातील दारुचे अड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:03 PM2022-02-23T22:03:53+5:302022-02-23T22:15:27+5:30
Bihar Liquor Ban: या मोहिमेअंतर्गत मंगळवारी पहिल्याच दिवशी 5 अवैध दारुच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.
पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. आता हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गाचा अवलंब केला आहे. बिहार पोलिसांनी फ्लाइंग स्क्वॉड आणि ड्रोनद्वारे अवैध दारू अड्डे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हे अड्डे शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर सुरू केला आहे.
पहिल्याच दिवशी कारवाई
या मोहिमेअंतर्गत मंगळवारी पहिल्याच दिवशी अवैध दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. दारुबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरने पाटणा ते गंगेच्या काठावरील भागाचे हवाई सर्वेक्षण केले आणि 5 अवैध दारुचे अड्डे शोधले. अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळवले आहे. आता हे अधिकारी पुढील कारवाई करतील. त्याचा व्हिडिओही विभागाने जारी केला आहे.
देश में सर्वाधिक क्राइम वाले राज्य में शराब पकड़ने के लिए ड्रोन के बाद हेलीकॉप्टर! कल स्नाइपर या फाइटर जेट?
— बिहार राजद (@RJD_BiharState) February 23, 2022
इसे पैसे की बर्बादी या शराब के पीछे @NitishKumar का पागलपन ही ना समझें, यह सर्वाधिक अफसरशाही वाले गरीब राज्य में अफसरों के सरकारी खर्च पर हेलीकॉप्टर पर घूमने की हवस भी है! pic.twitter.com/iwMpOHkh2V
दररोज 6 ते 7 तास चालेल ऑपरेशन
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण बिहारमध्ये अवैध दारुची दुकाने शोधली जाणार आहेत. तसेच, त्या त्या-त्या भागातील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना सांगून ते अड्डे उद्ध्वस्त केली जातील. दारुबंदी विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार बक्सर ते कटिहार आणि गंगा नदीपर्यंत 11 भागात सतत सर्वेक्षण केले जाणार आहे.
हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 5 लोक बसू शकतात
हे हेलिकॉप्टर दररोज 6 ते 7 तास सतत ऑपरेशन करू शकते. विमानाच्या प्रत्येक तासाला 75 हजार ते एक लाख रुपये खर्च येईल. हवाई सर्वेक्षणादरम्यान, उत्पादन विभागाच्या अधिका-यांसह अभियंते आणि सपोर्ट डिटेक्शन तज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत. सपोर्ट डिटेक्शन तज्ञ क्षेत्र ओळखतील आणि ठिकाण चिन्हांकित करतील.
विषारी दारुमुळे 5 महिन्यांत 57 जणांचा मृत्यू
दारुबंदीनंतरही बिहारमध्ये सतत बनावट दारू पिऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेतियातील नौतन ब्लॉकच्या दक्षिण तेल्हुआ गावात बनावट दारूमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला होता. तर, गोपालगंजमध्येही बनावट दारू प्यायल्याने 18 जण दगावले. याशिवाय, डिसेंबरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 2022 मध्येही विषारी दारुचा कहर सुरूच आहे. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी नालंदामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.