आधी स्वत:च्या कुटुंबातील घोटाळे पाहा, मोदींना अटक करू म्हणणाऱ्या मीसा भारतींना फडणवीसांच प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 04:09 PM2024-04-11T16:09:38+5:302024-04-11T16:11:52+5:30
Bihar Lok Sabha Election 2024: सत्तांतर होऊन इंडिया आघाडी ( INDIA Opposition Alliance) सत्तेवर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) भाजपाचे अनेक नेते तुरुंगात असतील, असे विधान मिसा भारती यांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस (Devendra Fadnavis) यांनीही मिसा भारती (Misa Bharti ) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि आरजेडी उमेदवार मिसा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होऊन इंडिया आघाडी सत्तेवर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासूनभाजपाचे अनेक नेते तुरुंगात असतील, असे विधान मिसा भारती यांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनीही मिसा भारती यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मिसा भारती यांनी केलेल्या विधानाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मीसा भारती यांनी इतरांवर टीका करण्याआधी स्वत:कडे आणि स्वत:च्या कुटुंबातील घोटाळ्यांकडे पाहिलं पाहिजे. यांचं संपूर्ण कुटुंब घोटाळ्यांमध्ये अडकलेलं आहे. त्यामुळे मिसा भारती यांनी अशी विधानं करून लोकशाहीची थट्टा करता कामा नये, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
मिसा भारती यांच्या या विधानावर इतर नेत्यांनीही टीका केली आहे. शाहनवाझ हुसेन म्हणाले की, मिसा भारती यांनी स्वत:ची काळजी केली पाहिजे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, सर्वच्या सर्व ४० जागांवर एनडीएचाच विजय होईल. पंतप्रधान नरेद मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील. तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, विरोधक २०२९ पर्यंत तर सत्तेवर येणार नाहीत. पुढचं पुढे पाहता येईल. आपल्या कार्यकाळात किती घोटाळे केले हे मिसा भारती यांनी सांगितलं पाहिजे.