VIDEO: माँ तुझे सलाम... शहीद वीराच्या आईच्या चरणाशी तरुणांनी अंथरली तळहाताची चादर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:29 PM2022-08-15T17:29:38+5:302022-08-15T17:30:59+5:30
कार्यक्रमात सहभागी तरुणांनी जयकिशोर यांच्या मातोश्रींसाठी चक्क आपल्या तळहाताची चादर केली आणि त्यावरुन मातोश्रींना चालत येण्यास सांगून स्वागत केलं.
पाटणा-
बिहारला वीरांची भूमी असं म्हटलं जातं. बिहारचे वीर देशाच्या सेवेत जीवाची पर्वा न करता राष्ट्राच्या रक्षणासाठी बलिदान देण्यासाठी सज्ज असतात. वैशालीतील असाच एक जवान होता जयकिशोर सिंह ज्यांना गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबतच्या हल्ल्यात वीरमरण आलं. याच वीर जवानाला आज बिहारमध्ये एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जयकिशोर सिंह यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ आज बिहारमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात सहभागी तरुणांनी जयकिशोर यांच्या मातोश्रींसाठी चक्क आपल्या तळहाताची चादर केली आणि त्यावरुन मातोश्रींना चालत येण्यास सांगून स्वागत केलं.
तरुणांच्या तळहातावर चालत येत जयकुमार यांच्या मातोश्री आपल्या वीर मुलाच्या प्रतिमेपाशी आल्या. शहीद वीराची आरती करण्यात आली आणि आपल्या लाडक्या मुलाच्या आठवणीनं आईच्या डोळ्यात अश्रू तरळलेले पाहायला मिळाले. पोटच्या पोराच्या प्रतिमेला हार घालताना आईला अश्रू अनावर झाले आणि फोटो उराशी घेऊन त्या रडू लागल्या. उपस्थित तरुणांनी जयकिशोर यांच्या मातोश्रींना आधार दिला आणि त्यांचं सांत्वन केलं.
देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात आली. वैशालीच्या चकफतेह गावात तरुणांनी तिरंगा फडकवण्यासाठी आणि शहीद जयकिशोर सिंह यांच्या प्रतिमेजवळ पोहोचले होते. शहीदांच्या स्मरणार्थ एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात शहीद जयकिशोर सिंह यांच्या मातोश्री पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पोहोचल्यावर तरुणांनी शहीद मातेचा सन्मान करत तळहाताची चादर केली. त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित तरुणांच्या तळहातावर चालत मुलाच्या प्रतिमेजवळ मातोश्री पोहोचल्या. जयकिशोर सिंह हे दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. शहीदाची आई मंजू देवी आपल्या मुलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना येताना पाहून तरुण जमा झाले आणि त्यांनी तळवे जमिनीवर टेकवले. यानंतर शहीद आईला तळहातावर चालण्याची विनंती केली. शूर शहीदाची आई तरुणांची विनंती टाळू शकली नाही आणि तरुणांच्या तळहातावर चालत स्मारकापर्यंत पोहोचल्या.
बिहार के वैशाली में शहीद बेटे की प्रतिमा पर माल्यार्पण करने पहुंची मां के पैरों तले युवाओं ने हथेलिया बिछा दीं.#Biharpic.twitter.com/Sy7Pdwm31W
— Nitesh Ojha (@niteshojha786) August 15, 2022
'भारत माता की जय'चा जयघोष
गावातील तरुणांचा उत्साह पाहून टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या वातावरणात रंगलं होतं. लोक भारत माता की जयच्या घोषणा देऊ लागले. असा सन्मान मिळाल्यावर शहीद जय किशोर सिंह यांच्या आईला खूप अभिमान वाटला आणि आपल्या शहीद मुलाच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
मुलाच्या हौतात्म्याचा अभिमान
"माझ्या मुलाचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही", असे शहीद जय किशोर यांच्या आईनं यावेळी म्हटलं. तळहात पुढे करुन शहीद वीराच्या आईच्या सन्मान करणाऱ्या तरुणांपैकी एक असलेल्या अंकित कुमार यानं हे आमचं भाग्य की एका शहीदवीराची आई आज आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आई आपल्या गर्भात मुलाला सांभाळते मग त्याला मोठं करते आणि काळजावर दगड ठेवून देशसेवेसाठी सीमेवर पाठवते, अशा आईचा आदर करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असं कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी म्हटलं.