तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:00 IST2022-12-13T15:49:33+5:302022-12-13T16:00:14+5:30
Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा
पाटणा: बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. यासोबतच नितीश कुमारांनी आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले.
महाआघाडी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे धक्कादायक आणि मोठे विधान केले आहे. सीएम नितीश यांनी अचानक एनडीए सोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा असे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राज्याची राजधानी पाटणा येथे मंगळवारी महाआघाडी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, '2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. आम्हा सर्वांना फक्त भाजपला हटवायचे आहे.
नितीश कुमार यांनीही एनडीएशी संबंध तोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. नितीशकुमार यांनी दुसऱ्यांदा असे केले. याआधीही त्यांनी एनडीएशी संबंध तोडून महाआघाडीत प्रवेश केला होता. नंतर पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊन सरकार स्थापन केले.नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा भाजपशी संबंध तोडल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले.