विष्णुपद मंदिरात मुस्लिम मंत्री आल्याने वाद; मंदिरात प्रशासनाकडून गर्भगृहाचे शुद्धीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:28 PM2022-08-23T14:28:37+5:302022-08-23T14:41:09+5:30
बिहारच्या गया येथील विष्णुपद मंदिरात गैर हिंदूंना प्रवेश नाही, त्यामुळे आता भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे.
गया: बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झाल्यापासून दररोज कोणत्या ना कोणत्या मंत्र्याबाबत वाद चव्हाट्यावर येत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मंत्री मोहम्मद इस्रायल मन्सूरी यांनी विष्णुपद मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. गया मंदिराच्या गर्भगृहात गैर-हिंदू मंत्र्याने प्रवेश केल्यामुळे भाजपने सरकारवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी विष्णुपद मंदिरात पुजेसाठी आले होते, यावेळी त्यांच्यासोबत अनेक मंत्री होते. यात बिहारचे माहिती तंत्रज्ञान मंत्री डॉ. इस्रायल मन्सूरीदेखील होते. सर्व मंत्री गेल्यानंतर याबाबतची माहिती श्री विष्णुपद प्रबंध करिणी समितीचे अध्यक्ष शंभूलाल विठ्ठल आदींना मिळाली. यानंतर मंदिर प्रशासनाने गर्भगृहाचे शुद्धीकरण केले. इतर धर्मातील व्यक्तींना मंदिरात प्रवेश नसल्यामुळे हे शुद्धीकरण करण्यात आले.
याबाबत सांगताना शंभूलाल विठ्ठल म्हणाले की, इस्रायल मन्सूरी नव्याने मंत्री झाले आहेत, त्यांना फार कोणी ओळखत नाही. त्यामुळे मंदिर प्रशासनातील लोकांनी त्यांना अडवले नाही. पण, त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी आणि आमदारांनी मंत्र्याला मंदिराची माहिती द्यायला हवी होती. दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपने नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली आहे. तर, भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी इस्रायल मन्सूरी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.