शिक्षिका पगार घ्यायला गेली, संचालक तिका घेऊन पळून गेला; घरच्यांनी शाळा पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 03:40 PM2022-09-12T15:40:49+5:302022-09-12T15:40:58+5:30
मुलगी घरी न परतल्याने संतप्त नातेवाईकांनी शाळेची तोडफोड करत आग लावली.
बिहारच्या बगाहामध्ये शाळेच्या संचालकाने शिक्षकेला पळून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिक्षिकेच्या संतप्त कुटुंबीयांनी शाळेची तोडफोड केली आणि आग लावली. जाहिदा खातून पब्लिक स्कूलचा संचालक हैदर अली सय्यद याने पगार देण्याच्या बहाण्याने शिक्षिकेला बोलावल्याचा आरोप मुलीची आई संगीता देवी यांनी केला आहे.
पगार घेण्यासाठी तरुणी शाळेत गेली आणि घरी परतलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने संतप्त नातेवाईकांनी शाळेची तोडफोड करून आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, बगाहा येथील पिप्रासी पोलीस स्टेशन हद्दीच्या सौरहा गावातील जाहिदा खातून पब्लिक स्कूलची ही घटना आहे. शाळेत एक महिला शिक्षिका शिकवत असे. महिलेचा गेल्या 6 महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. यामुळे शिक्षिकेने नोकरी सोडून दिली होती. 2 सप्टेंबर रोजी संचालक हैदर अली सय्यदने महिलेला पगार घेण्यासाठी शाळेत बोलावले.
दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबरला महिला पगार घेण्यासाठी शाळेत गेली असता, हैदरने तिला पगार देण्याच्या नावाखाली कुशीनगर जिल्ह्यातील जाठा बाजार येथे नेले, तेव्हापासून ती बेपत्ता आहे. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला मात्र ती सापडली नाही. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पिप्रासी पोलीस ठाण्यात हैदर अली सय्यद, अन्सारी जाहिदा यांच्या नावावर एफआयआर दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.