Accident: पोलीस जिप्सीवर ट्रक उलटला, भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:27 PM2022-01-04T12:27:14+5:302022-01-04T12:27:28+5:30
Accident: स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या अपघातात जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथे दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. आज(मंगळवार) पहाटे 5 वाजता झालेल्या अपघातात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर इतर 2 पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या वाहनावर एक भरधाव ट्रक उलटल्याने हा अपघात झाला आहे.
पोलिसांचा होरपळून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरदाणीबाग पोलिसांचे गस्तीचे वाहन (जिप्सी) बेऊर मोरजवळ रस्त्याच्या कडेला उभे होते. यादरम्यान भरधाव वेगाने येणारा वाळुचा ट्रक अचानक जिप्सीवर उलटला. हा ट्रक उलटताच पोलिसांच्या वाहनाला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यादरम्यान जिप्सीमध्ये 5 पोलिस कर्मचारी बसले होते. लोक आणि पोलीस मदतीसाठी पोहोचले तोपर्यंत 3 जवानांचा मृत्यू झाला होता. दोन जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चालक ट्रक सोडून पळून गेला
ट्रेनी डीएसपी प्रांजल त्रिपाठी यांनी सांगितले की, ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. रस्त्यावरील दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचा चालक गाडी सोडून पळून गेला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुळी तपास करत आहेत. आजूबाजूच्या लोकांकडूनही माहिती घेतली जात आहे.
धुक्यामुळे अपघात
मृत्युमुखी पडलेले तिघेही होमगार्ड जवान होते. प्रभू साह, पुखराज कुमार (दोघेही होमगार्ड कर्मचारी) आणि राजेश कुमार (चालक, जिल्हा पोलिस दल) अशी मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जखमी पोलिसांमध्ये एएसआय सियाचरण पासवान आणि होमगार्ड श्रीकांत सिंग यांचा समावेश आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अपघात घडला तेव्हा रस्त्यावर दाट धुके होते. या धुक्यामुळे समोरुन येणारी वाहने स्पष्ट दिसत नव्हते. या धुक्यामळेच हा अपघात झाला.
500 मीटर पर्यंत स्फोटाचा आवाज घुमला
स्थानिकांनी सांगिल्यानुसार, स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातात पोलिस जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेनंतर गरदाणीबाग आणि बेऊर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकानेही तेथे पोहोचून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.