Bihar News: 'गंगाजल'चा सीन जेव्हा खरा होतो, हफ्ता वसुलीसाठी इन्स्पेक्टरने अडवली थेट एसपीची गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:08 PM2022-03-14T17:08:38+5:302022-03-14T17:09:16+5:30
Bihar News: सहायक पोलीस निरीक्षकाने हफ्ता वसुलीसाठी थेट एसपीची गाडी अडवली. त्यानंतर झाले असे...
पाटणा: प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटातील दरोगा मंगनी रामचा सीन लोकांच्या मनात घर करुन बसलेला आहे. अजय देवगणची स्टारकास्ट असलेला हा चित्रपट दरोगा मंगनी रामच्या सीनमुळे खूप चर्चेत राहिला. पण रील लाईफमध्ये चर्चेत असलेल्या या सीनने रिअल लाईफ एसपींना धक्का बसला आहे. बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे.
गंगाजल चित्रपटात बस थांबवून पोलिस अधिकारी हफ्ता वसुली करत असतो, तशाच प्रकारची हफ्ता वसुली करण्यासाठी एका सहाय्यक उपनिरीक्षकाने जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकावरच हात टाकला. वसुली करण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने एसपी साहेबांची गाडी थांबवली. यानंतर एसपींनी त्या पोलिसाला निलंबित केले आणि त्याच्यावर विभागीय कारवाईचे आदेश दिले.
पोलीस अधिकारी निलंबित
या प्रकरणाची माहिती देताना शेखपुराचे एसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, कासार पोलिस स्टेशनमध्ये तैनात असिस्टंट सब इन्स्पेक्टर रणवीर प्रसाद यांना अवैध वसुली केल्याप्रकरणी तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. हा पोलीस अधिकारी चंडी पहाड येथून दगड आणि इतर माल वाहून नेणाऱ्या वाहनांकडून सातत्याने अवैध वसुली करत असल्याचा दावाही एसपींनी केला.
एसपी सामान्य वेषात घटनास्थळी गेले
रणवीर प्रसाद यांच्याबद्दल लोकांनी एसपींकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, रणवीर प्रसाद रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पन्ना-शंभर रुपये घेत असे. या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला पकडण्यासाठी एसपी कार्तिकेय शर्मा स्वत: सामान्य माणसाच्या वेशभूषेत घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला रंगेहात पकडले.
एसपींची अधिकाऱ्यांविरोधात कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षकाने एसपींना वसुलीसाठी हात देऊन थांबवले. एसपी जवळ येताच त्याला धक्का बसला. पण तोपर्यंत एसपींनी त्याची सगळी कृत्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. यानंतर तात्काळ प्रभावाने सहायक निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. वाहनांकडून अवैध वसुली केल्याप्रकरणी आठ पोलिसांना यापूर्वी एसपींनी निलंबित केले होते. हे आठ पोलीस शेखपुरा आणि चेहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित होते. आजकाल, एसपी रात्री उशिरा रस्त्यावर उतरुन पोलिसांना रंगेहात पकडत आहेत.