माध्यान्ह भोजनात आढळली आळी; मुख्याध्यापक म्हणाले- 'व्हिटॅमिन आहे, गुपचूप खा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 02:27 PM2022-11-13T14:27:32+5:302022-11-13T20:50:07+5:30
काही विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने मारहाण केली, यात एकाचा हात मोडला.
वैशाली: बिहारच्या वैशाली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात किडे आढळून आले. मुलांनी याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता त्यांनी धक्कादायक उत्तरे दिली. मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितले की, कीटकांमध्ये जीवनसत्त्वे(व्हिटॅमिन) असतात, गुपचूप खा...इतकंच नाही, तर विद्यार्थ्यांनी त्यास नकार दिल्याने शिक्षकाने एकाचा हात तोडला.
वैशाली जिल्ह्यातील लालगंज अतातुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेचे हे प्रकरण आहे. येथील मुलांना माध्यान्ह भोजन दिले जाते. शनिवारी माध्यान्ह भोजन देण्यात आले, यात भोजनात किडे आढळले. यावर विद्यार्थिनींनी याबाबत मुख्याध्यापक मोहम्मद मिसावुद्दीन यांच्याकडे तक्रार केली. मात्र, मुलांना चांगले जेवण देण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मुलांना वेगळेच उत्तर दिले.
मारहाणीत विद्यार्थ्याचा हात तुटला
विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापक म्हणाले, ‘किड्यांमध्ये जीवनसत्व आहे, शांतपणे खा.’ उत्तर ऐकून विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले. काही विद्यार्थ्यांनी जेवण घेण्यास नकार दिला, यावेळी प्राचार्य मो. मिसावुद्दीनने त्यांना मारहाण केली. इतकी मारहाण केली की, एका विद्यार्थिनीचा हातही तुटला. यानंतर या प्रकरणाने आणखीनच पेट घेतला. ज्या विद्यार्थिनीचा हात मोडला होता, तिच्या नातेवाईकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला. शाळेतील गोंधळानंतर या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.