"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:40 PM2024-08-15T12:40:12+5:302024-08-15T12:40:48+5:30

Nitish Kumar : नितीश कुमार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राज्यातील तरुणांना पूर्वी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक सरकारी नोकऱ्या आणि रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे.

bihar Nitish Kumar announced to give 12 lakh jobs to youth | "१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा

"१० लाख नाही तर १२ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देणार"; नितीश कुमारांची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राज्यातील तरुणांना पूर्वी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक सरकारी नोकऱ्या आणि रोजगार देण्याची मोठी घोषणा केली आहे. येत्या निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांना १२ लाख सरकारी नोकऱ्या देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी १० लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही संख्या वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

नितीश कुमार पुढे म्हणाले की, "राज्यातील तरुणांना सातत्याने सरकारी नोकऱ्या दिल्या जात आहेत. २०२० मध्ये १० लाख रोजगार आणि १० लाख रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सुद्धा मीच म्हणालो होतो. आतापर्यंत ५ लाख १६ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय सुमारे दोन लाख पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे."

"आता आम्ही ठरवलं आहे की, यंदाच्या निवडणुकीपूर्वी आणि पुढच्या वर्षी १० लाखांऐवजी १२ लाख नोकऱ्या तरुणांना देण्यात येतील. मी २०२२ मध्ये सांगितलं होतं की १० लाख आधीच ठरवलं होतं. आता ही संख्या इतकी वाढत आहे की नोकऱ्यांची संख्या १० लाखांवरून १२ लाखांवर जाईल."

"आम्ही रोजगार देण्याबाबतही बोललो होतो, १० लाख लोकांना रोजगार देणार आहोत. मात्र, गेल्या चार वर्षात विविध क्षेत्रात २४ लाख लोकांना रोजगार देण्यात आला आहे. आता या वर्षी आणि पुढच्या वर्षी निवडणुकांपूर्वी आणखी १० लाख नोकऱ्या दिल्या जातील. अशाप्रकारे १० लाखांऐवजी १२ लाख सरकारी नोकऱ्या देणार आहोत."

नितीश कुमार यांनीही तेजस्वी यादव यांचं नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, "तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. मधेच काही लोक आमच्यात सामील झाले आणि इकडे तिकडे काहीतरी बोलत राहिले. नोकऱ्या आणि रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत."
 

Web Title: bihar Nitish Kumar announced to give 12 lakh jobs to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.