महाराष्ट्रापूर्वी बिहारने निर्णय घेतला; वीज बिल २४ टक्क्यांनी वाढणार, ग्राहक शॉकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:29 PM2023-03-23T15:29:44+5:302023-03-23T15:31:16+5:30
महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारने वीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगढ अगोदर बिहारनेवीजेचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बिहारमधील विद्युत ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. बिहार वीज नियामक आयोगाने वीज दरात वाढ जाहीर केली आहे. राज्यातील वीज दरात २४.१० टक्के वाढ झाली आहे. आता सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या आधारे प्रति युनिट वीज दर निश्चित केला जाणार आहे.
वीज दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा तसेच स्थिर शुल्कातही दोन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. वीजपुरवठ्याच्या दरात झालेल्या वाढीच्या आधारे हे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, वीज नियामक आयोगाने कंपन्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. मात्र, यानंतरही बिहारच्या जनतेला आता वीज बिलात जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
'प्रति युनिट विजेच्या दरात वाढ करण्याबरोबरच वीज बिलाच्या निश्चित शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी निश्चित शुल्क वाढले आहे, अशी माहिती बिहार वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष शिशिर कुमार सिंह यांनी दिली.
वाहनधारकांना बसणार झटका! महामार्गावरील प्रवास महागणार, १ एप्रिलपासून टोलचे दर वाढणार
सध्या बिहारमधील ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना ५० युनिट वीज वापरण्यासाठी प्रति युनिट ६.१० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे, यापेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट ६.४० रुपये मोजावे लागतात. शहरी भागात १०० युनिटपर्यंत वीज वापरासाठी प्रति युनिट ६.१० रुपये, तर अधिक वीज वापरासाठी ६.९५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागतो. मात्र, विजेचे दर वाढल्यानंतर वीजग्राहकांना प्रति युनिट किती रुपये मोजावे लागतील, याची माहिती नाही मिळालेली नाही, आता सरकार त्यावर सबसिडीही जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार
महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार आहेत. तसा दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे मजबूत कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी संबंधितांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले.