बिहारमध्ये पोलीस भरतीत एक हजार ‘तोतयां’ना अटक
By admin | Published: March 30, 2015 02:02 AM2015-03-30T02:02:34+5:302015-03-30T02:02:34+5:30
अलीकडेच झालेल्या शालांत परीक्षेत एका परीक्षा केंद्राच्या इमारतीवर पाच चौथ्या मजल्यापर्यंत बाहेरून चढून शेकडो पालकांनी आपल्या पाल्यांना खिडकीतून ‘कॉप्या’ पुरवून बिहारच्या
पाटणी : अलीकडेच झालेल्या शालांत परीक्षेत एका परीक्षा केंद्राच्या इमारतीवर पाच चौथ्या मजल्यापर्यंत बाहेरून चढून शेकडो पालकांनी आपल्या पाल्यांना खिडकीतून ‘कॉप्या’ पुरवून बिहारच्या शिक्षण व्यवस्थेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली होती. त्यानंतर आता तेथे सुरु असलेल्या पोलीस भरतीतही तोतयेगिरी करणाऱ्या एक हजाराहून अधिक उमेदवारांना अटक करण्यात आल्याने त्या राज्याच्या प्रशासनाची उरलीसुरली विश्वासार्हताही संपुष्टात आली आहे.
बिहारमध्ये पोलीस भरतीसाठी गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्यांची शारीरिक चाचणी सध्या घेण्यात येत आहे. यासाठी एकूण ५२ हजार उमेदवार पात्र ठरले असून त्यांना येथील पाटलीपुत्र स्टेडियममध्ये शारीरिक चाचणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलाविले जात आहे.
यावेळी समोर आलेला उमेदवार आणि त्याने अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे यांची पडताळणी केली असता असली उमेदवाराच्या नावे तोतयेगिरी करून १,००६ जणांनी लेखी परीक्षा दिल्याचे गेल्या आठवडाभरात निदर्शनास आल्यानंतर या उमेदवारांना अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्याचे पोलीस महासंचालक पी. के. ठाकूर यांनी सांगितले की, परीक्षेच्या अर्जावर लावलेले छायाचित्र बदलून किंवा ते ‘मॉर्फ’ करून, बनावट स्वाक्षऱ्या करून आणि प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे बनावट सादर करून ही तोतयेगिरी करण्यात आल्याचे उघड झाले. उमेदवारांची छाननी करण्याची ही प्रक्रिया नुकतीच सुरु झाली असून शारीरिक क्षमता चाचणीसह ती एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण करून पोलीस शिपायांची भरती करण्याचा आमचा मानस आहे, असे ठाकूर म्हणाले.