कारागृहातून फोन प्रकरणात लालू अडचणीत, पाटण्यात FIR; रांचीच्या बंगल्याहून रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 06:00 PM2020-11-26T18:00:26+5:302020-11-26T18:11:16+5:30
दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना रांची येथील 1 केली बंगल्याहून राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स)मध्ये हलविण्यात आले आहे. लालू हे चारा घोटाळ्यातील दोषी असून शिक्षा भोगत आहेत.
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारागृहातूनच भाजप आमदार ललन पासवान यांना फोन केल्याप्रकरणी लालूंविरोधात पाटणा येथील पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. खुद्द ललन पासवान यांनी ही FIR दाखल केली आहे. त्यांनी लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना रांची येथील 1 केली बंगल्याहून राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स)मध्ये हलविण्यात आले आहे. लालू हे चारा घोटाळ्यातील दोषी असून शिक्षा भोगत आहेत.
जेलमधून फोन करत ललन पासवान यांना प्रलोभन दिल्याप्रकरणी हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (HAM) अध्यक्ष जीतन राम मांझी म्हणाले, मला सांगण्यात आले, की लालू यादवांनी अनेक लोकांना फोन केले. त्यांची माझ्याबरोबरही बोलण्याची इच्छा होती. मात्र, मी त्यांच्याशी बोललो नाही. जीतनराम मांझी म्हणाले लालू प्रसादांचा इरादा चुकीचा आहे.
सुशील कुमार मोदींनी केला होता आरोप -
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि बीजेपी नेते सुशील कुमार मोदी यांच्या आरोपानंतर बिहारचे राजकारण ढवळून निघत आहे. सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता, की लालू यादव हे रांचीमधील रिम्सच्या 1 केली बंगल्यातूनच NDAच्या आमदारांना प्रलोभन देत होते आणि नितीश कुमारांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. भाजपने लालूंचा आणि आमदार ललन पासवान यांच्या संवादाचा ऑडिओदेखील जारी केला आहे. भाजप आमदार ललन पासवान म्हणाले, लालू प्रसादांनी त्यांना मंत्रीपद देऊ केले आणि बिहार विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, ललन पासवान यांनी म्हटले आहे, की ते पक्षाबरोबर आहेत.
आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं -
बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले होते, तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवले गेले आहे, असेदेखील तेजस्वी यांनी म्हटले होते. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत, अशी मागणीही केली होती. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला", असेही तेजस्वी यादव म्हटले होते. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मते मोजणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले होते.