Misa Bharti : "भाजपाचे सर्व मंत्री तुरुंगात जातील, मी असं बोललेच नाही"; मीसा भारती यांनी मारली पलटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:43 PM2024-04-12T13:43:30+5:302024-04-12T13:59:56+5:30
Misa Bharti : मीसा भारती यांनी आपलं विधान आता मागे घेतलं आहे. जर चौकशी झाली तर पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री जेलमध्ये जातील असं त्या म्हणाल्या होत्या. पण त्यांनी आता पलटी मारली आहे.
पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांनी आपलं विधान आता मागे घेतलं आहे. जर चौकशी झाली तर पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री जेलमध्ये जातील असं त्या म्हणाल्या होत्या. पण त्यांनी आता पलटी मारली आहे. माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. मीडियाने माझं पूर्ण विधान दाखवावं असं म्हटलं आहे.
आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती म्हणाल्या की, "भविष्यात जर इलेक्टोरल बाँडची चौकशी झाली तर नक्कीच कारवाई केली जाईल, असं आम्ही सांगितलं होतं. मीडिया अजेंडा ठरवू शकत नाही. पक्ष आणि विरोधी पक्षांनी अजेंडा सेट केला पाहिजे आणि मीडिया ज्या प्रकारे अजेंडा ठरवत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. जेलमध्ये जातील असं आम्ही म्हटलं नाही."
"जर चौकशी झाली तर पाहू असं आम्ही म्हटलं होतं. मीडियाने हे चुकीच्या पद्धतीने दाखवलं आहे." आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी नुकतंच एक मोठं विधान केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी इलेक्टोरल बाँड्सवर प्रश्न उपस्थित केले होते आणि हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटलं होतं.
चौकशी झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे सर्व नेते तुरुंगात जातील, असंही मीसा भारती यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता मीसा भारती यांनी मी असं म्हटलंच नाही, मीडियाने माझ्या विधानाचा विपर्यास केला, जे योग्य नाही असं सांगितलं आहे.