'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 04:32 PM2021-10-16T16:32:02+5:302021-10-16T16:32:09+5:30
एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत.
कटिहार - बिहारमधील (Bihar) कटिहार जिल्ह्यातील मनिहारीच्या केवला पंचायतीमधील हंसवार या छोट्याशा गावातील रहिवासी बबलू मंडलला Dream11 ने एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या (Bablu Mandal) घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत.
यासंदर्भात बोलताना रातोरात कोट्यधीश झालेल्या बबलूने सांगितले की, त्याच्या पत्नीचा भाऊ, छोटू (मेहुणा), हा त्याला प्लंबर मिस्त्री कामात मदत करत होता. त्याने बबलूला ड्रीम 11 अॅप डाउनलोड करून दिले आणि खेळायला शिकवले. यानंतर बबलूने सुरुवातीला 49 रुपये गुंतवले, यातून त्याला 200 रुपये मिळाले. पण, यानंतर तो हळूहळू हरू लागला. मात्र, रविवारी आयपीएलमध्ये, डीसी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेला सामना खेळणाऱ्या दोन्ही संघातील 11 खेळाडूं निवडून त्याने गेममध्ये 59 रुपये लावले होते.
यानंतर त्याला सकाळी मेसेज आला, की तो पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता एक कोटी रुपयांवर तीस लख रुपयांचा जीएसटी कापून त्याच्या खात्यात सत्तर लाख रुपये पाठविण्यात आले आहेत.
पक्क घर बांधणार -
यानंतर, बबलू म्हणाला, त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तो त्याचे तुटलेले घर आता पक्के करेल. यानंतर, जे पैसे उरतील ते मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी खर्च केले जातील. याच बरोबर निराधार लोकांना मदत आणि पूजा पाठही केला जाईल. यापूर्वीही एका व्यक्तीने असेच एक कोटी रुपये जिंकले आहेत.