उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:50 PM2022-08-11T15:50:49+5:302022-08-11T15:51:28+5:30

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे.

Bihar Political Crisis: How did Nitish Kumar avoid becoming like Uddhav Thackeray?; Read Inside Story | उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

उद्धव ठाकरेंसारखा धक्का बसण्यापासून नितीश कुमार कसे वाचले?; वाचा बिहारमधील Inside Story 

Next

पटना - बिहारच्या राजकारणात महाराष्ट्रासारखी पटकथा लिहिली जात होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. बिहारमध्येही आरसीपी सिंह यांच्या निमित्ताने शिंदे मॉडेलची राजकीय पुनरावृत्ती सुरू होती. परंतु याची वेळीच भनक ओळखून नितीश कुमारांनी अशी तयारी केली ज्यामुळे जेडीयूची अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी झाली नाही. 

नितीश कुमार यांनी एकीकडे भाजपाच्या नेतृत्वाचा भरवसा कायम ठेवला तर दुसरीकडे आरजेडीसोबत मिळून सरकार बनवण्याची रणनीती आखत राहिले. नितीश कुमारांनी आरसीपी सिंह यांची हालचाल पाहून त्यांचे अधिकार छाटण्याचे काम सुरू केले. त्यानंतर भाजपाला मात देण्यासाठी प्लॅनिंग रचली. त्यामुळे चिराग पासवान आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी अवस्था नितीश कुमारांची होण्यापासून वाचली. 

लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराजच्या दहशतीत विकासाचं राजकारण करणारं नेतृत्व म्हणून नितीश कुमार संघर्षातून राजकारणात आले आहेत. भाजपासोबत नितीश कुमार सरकार चालवत होते. परंतु भाजपाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष होते. कारण २०२० पासून बिहार भाजपा नेत्यांच्या मनात सर्वाधिक जागा मिळूनही नितीश कुमारांच्या हाताखाली काम करणं खुपसतं होते. दबावामुळे नितीश कुमारांच्या नेतृत्वात सरकार चालवावी लागत होती. 

आता राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री असावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा होती. परंतु केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे सगळे शांत होते. मात्र भाजपात नाराजी पसरत चालली होती. जेडीयू-भाजपा नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगत होते. याचवेळी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे बंड पुढे आले. तेव्हा शिवसेनेप्रमाणे जेडीयूत फोडाफोडी करण्यात यश आले तर बिहारमध्ये बाजी पलटू शकते असं भाजपा नेत्यांना वाटत होते. 

भाजपाचे नेते आरसीपी सिंहमध्ये नवीन 'एकनाथ शिंदे' शोधत असल्याचा आरोप जेडीयू नेत्यांनी केला आहे. बिहारमध्ये आरसीपी सिंह यांच्या बहाण्याने जेडीयूमध्ये फोडाफोडी करण्याच्या तयारीत होते, पण नितीश कुमार अतिशय काटेकोरपणे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आरसीपी सिंह यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक नितीश यांना ठाऊक होती. जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी आरसीपीवर निशाणा साधताना 'नितीश कुमारांनी आंधळा विश्वास ठेवला, पण तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला' असे म्हटले आहे. भाजपचे एजंट बनून जेडीयूमध्ये काम केले असा आरोप केला. 

आरसीपी सिंह यांना कमकुवत केले
बिहारमधील जेडीयूचे राजकीय भवितव्य महाराष्ट्रातील शिवसेनेसारखे होऊ नये यासाठी नितीशकुमार यांनी आधीच सर्व तयारी केली होती. जेडीयूने आरसीपी सिंह यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले नाही त्यामुळे त्यांना केंद्राच्या मंत्रिपदावरूनही पायउतार व्हावं लागले. यानंतर, आरसीपीला कमकुवत करत, त्यांच्याकडून सर्व महत्त्वाची पदे हिसकावून घेतली आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना संपवण्यात आले. यातूनच नितीश कुमारांनी पार्टी वाचवली आणि उद्धव ठाकरेंची अवस्था त्यांची झाली नाही. 

Web Title: Bihar Political Crisis: How did Nitish Kumar avoid becoming like Uddhav Thackeray?; Read Inside Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.