भाजपासाठी धोक्याची घंटा?; बिहारमध्ये पुढील २४ तास महत्त्वाचे, नितीश कुमारांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:04 PM2022-08-08T16:04:31+5:302022-08-08T16:53:30+5:30

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे.

Bihar Political Update: Nitish Kumar Called all JDU MLA, MP Meeting, Congress, RJD Alert, BJP was Wait and Watch | भाजपासाठी धोक्याची घंटा?; बिहारमध्ये पुढील २४ तास महत्त्वाचे, नितीश कुमारांनी वाढवलं टेन्शन

भाजपासाठी धोक्याची घंटा?; बिहारमध्ये पुढील २४ तास महत्त्वाचे, नितीश कुमारांनी वाढवलं टेन्शन

Next

पटना - बिहारच्या राजकारणासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याच्या चर्चेमुळे सर्वच पक्षाने स्वत:ची रणनीती बनवली आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांसाठी बैठक बोलावली आहे. तर आरजेडीनेही आमदार-खासदारांना बैठकीसाठी बोलावलं आहे. काँग्रेसनंही त्यांच्या आमदारांना पटनात राहण्यास सांगितले आहे. तर जीतन राम मांझी यांनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. 

बिहारच्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. नितीश कुमार भाजपाशी युती तोडू शकतात आणि आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांना सोबत घेत नवीन सरकारची स्थापना करू शकतात असं बोललं जात आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एनडीएसाठी संकट उभं राहिले आहे. ज्याप्रकारे नितीश कुमार यांनी भाजपाशी अंतर ठेवले आहे ते पाहता नितीश कुमार काहीतरी मोठं पाऊल उचलणार असल्याचं बोलले जात आहे. नितीश कुमारांचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे. ११ ऑगस्टपर्यंत या दोन्ही नेत्यांची भेट होण्याचीही शक्यता आहे. परंतु अद्याप याला पुष्टी मिळाली नाही. 

बिहारमधील राजकीय घडामोडींवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. जेडीयू, आरजेडी आमदार-खासदारांची बैठक उद्या होणार आहे. भाजपानं सध्या वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राजकीय घडामोडीत एनडीए सरकार व्यवस्थित सुरु आहे. सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. २०१४ लोकसभा आणि २०२५ च्या विधानसभेसाठी तयारीला लागा असं भाजपा आमदारांना कळवण्यात आलं आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल असं भाजपानं म्हटलं आहे. 

नितीश कुमारांना बनायचंय पंतप्रधान?
राज्यात भाजपासोबत युती तुटली नाही तरीही जेडीयू नेते नितीश कुमार पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असा दावा करत आहेत. जेडीयूचे महासचिव अली अशरफ फातमी यांनी म्हटलंय की, देशाच्या पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांच्यापेक्षा मोठा नेता कुणी नाही. तर दुसरीकडे वीआयपी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री मुकेश सहानी यांनी नितीश कुमार जर महाआघाडीत सहभागी झाले तर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी जाणार नाहीत. जेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जाईल तेव्हाच जातील असं सांगितले आहे. 

Web Title: Bihar Political Update: Nitish Kumar Called all JDU MLA, MP Meeting, Congress, RJD Alert, BJP was Wait and Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.