Bihar Politics: फ्लोअर टेस्टपूर्वी आरजेडी नेत्यांच्या घरांवर सीबीआयचे छापे, २४ हून अधिक ठिकाणी धाडसत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:08 PM2022-08-24T12:08:05+5:302022-08-24T12:08:05+5:30
Bihar Politics: बिहार आणि झारखंडमध्ये बुधवारी सीबीआयने अनेक ठिकाणी छापेमारी केली. बिहारमध्ये आज नितीश कुमार सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी झाल्याने खळबळ उडाली आहे.
पाटणा - बिहार आणि झारखंडमध्ये बुधवारी सीबीआयने अनेक ठिकाणी छापेमारी केली. बिहारमध्ये आज नितीश कुमार सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी झाल्याने खळबळ उडाली आहे. सीबीआयने आरजेडीचे आमदार सुनील सिंह, खासदार अशफाक करीमी, खासदार फैय्याज अहमद यांच्या निवासस्थानांवर छापेमारी केली. या छापेमारीवेळी सुनील सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा कर्मचारी दिसून आले. एकूण २४ हून अधिक ठिकाणी हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार नोकरी घोटाळ्यासाठी कथित जमीन, अवैध खाणकाम आणि वसुलीच्या तपासासंबंधीच्या प्रकरणात दोन्ही राज्यांमध्ये सीबीआयने ही कारवाई केली. यामधील एक लोकेशन हे प्रेम प्रकाश यांचेही आहे. त्यांचे बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे बोलले जाते. त्याशिवाय झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या चौकशीनंतर ही छापेमारी करण्यात आली.
आरजेडीचे आमदार सुनील सिंह यांनी या छापेमारीबाबत सांगितले की, हे सारे जाणून बुजून केले जात आहे. याला काही अर्थ नाही आहे. घाबरून आमदार आपल्या बाजूने येतील, असे त्यांना वाटते, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. राज्यसभा खासदार फैय्याज अहमद यांच्या निवासस्थानावरही ईडीने छापेमारी केली आहे. दरम्यान, भाजपाकडून सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आरजेडी नेत्यांच्या घरावरील छापेमारीनंतर आरजेडी खासदार मनोज झा यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. हे ईडी, सीबीआयने टाकलेले छापे आहेत, असं म्हणणं चुकीचे ठरेल. ही भाजपाने केलेली छापेमारी आहे. आज बिहारमध्ये फ्लोअर टेस्ट आहे आणि इथे काय सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे.