नितीश कुमार अचानक राज्यपालांच्या भेटीला; हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 01:16 PM2024-01-23T13:16:00+5:302024-01-23T13:19:45+5:30

नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

bihar politics cm Nitish Kumar suddenly meets the Governor | नितीश कुमार अचानक राज्यपालांच्या भेटीला; हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय?

नितीश कुमार अचानक राज्यपालांच्या भेटीला; हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय?

Nitish Kumar ( Marathi News ) :बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज अचानक राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. या भेटीवेळी नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय चौधरी हेदेखील असल्याचं पाहायला मिळालं. नितीश कुमार हे आज सकाळी एका शासकीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र तिथून ते थेट राजभवानावर गेले. राज्यपालांसोबत त्यांची तब्बल ४० मिनिटे बैठक झाली. विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत नितीश कुमार आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. 

नितीश कुमार यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने बिहारचं राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. कारण मागील काही महिन्यांपासून नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका विधानाने याबाबतच्या चर्चांमध्ये आणखीनच भर टाकली. जेडीयू पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकते का, अशा प्रश्न एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमित शहा यांनी प्रस्ताव आल्यास विचार करू, असं म्हणत त्यांच्याकडून सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. 

का होत आहेत नितीश कुमारांच्या नाराजीच्या चर्चा?

देशभरातील विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीत आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल, अशी सुरुवातीपासून नितीश कुमार यांची अपेक्षा होती. मात्र इंडिया आघाडीच्या अनेक बैठका झाल्यानंतरही याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. तसंच नितीश कुमार यांनी मांडलेल्या इतर भूमिकांनाही काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचं बोललं गेलं. त्यामुळे नाराज झालेले नितीश कुमार पुन्हा एकदा वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे.
 

Web Title: bihar politics cm Nitish Kumar suddenly meets the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.