“पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:03 PM2023-09-28T15:03:55+5:302023-09-28T15:04:31+5:30
JDU Nitish Kumar Vs BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतात, असे कयास बांधले जात आहेत.
JDU Nitish Kumar Vs BJP: गेल्या काही दिवसांपासून बिहारचे राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतात, असे कयास बांधले जात आहेत. यावरून बिहारमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले असून, जेडीयूचे अध्यक्ष राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार किमान पुढचे सात जन्म भाजपकडे पाहणारही नाहीत, असा ठाम विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.
इंडिया आघाडीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या काही वेगळ्यात हालचाली सुरु असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. नितीश कुमार जदयूच्या कार्यालयातून अचानक लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतू लालूंनी त्यांना भेट दिली नसल्याचे समोर आले आहे. नितीश कुमार सुमारे २० मिनिटे तिथेच थांबून होते, असे सांगितले जाते. यानंतर उलट-सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
नितीश कुमारांशी भाजपची जवळीक कधीच वाढणार नाही
भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केले आहेत का? भाजप केवळ कामांच्या फार्स करते आणि त्यांना पाहिजे तेच करते. नितीश कुमारांशी भाजपची जवळीक कधीच वाढणार नाही, असा दावाही राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह यांनी यावेळी केला. दुसरीकडे, नितीश कुमार यांना लालू प्रसाद यादव यांची भेट घ्यायची होती. मात्र, तेजस्वी यादव आणि राबडी देवींशीच भेट घडवून त्यांना चालते करण्यात आले. लालू प्रसाद यादव तेव्हा घरी नव्हते असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अचानक कुठेही पोहोचणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या नव्या स्टाइलवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार सतत सरकारी कार्यालयांची पाहणी करताना दिसत आहेत. नुकतेच ते सचिवालयात पोहोचले होते. त्यावेळी सचिवालय कार्यालयात कर्मचारी न दिसल्याने ते नाराज झाले होते. यानंतर सीएम नितीश कुमार यांनी अचानक कार्यालयावर छापे टाकण्याची ही मालिका सुरू केली आहे.