जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:27 IST2024-08-25T18:26:27+5:302024-08-25T18:27:18+5:30
"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?"

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
जनसुराज पक्षाचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष बिहारमधील सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेल, तसेच 40 जागांवर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, आपला पक्ष 2030 च्या विधानसभा निवडणुकीत 70 ते 80 जागांवर महिला उमेदवार देईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ते रविवारी पाटण्यातील बापू सभागृहात आयोजित जन सूरज महिला संवाद कार्यक्रमानंतर प्रशांत किशोर पत्रकारांशी बोलत होते.
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यावर भर -
प्रशांत किशोर म्हणाले, जोवर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोवर समाजातील त्यांचा सहभाग समानतेच्या आधारावर होऊ शकत नही. यामुळे यावेळी 40 महिलांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी ४ टक्के व्याजाने कर्ज मिळावे, यासाठी सरकारी हमी आवश्यक आहे, अशी मागणीही प्रशांत किशोर यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी बिहारमध्ये जनतेचे सरकार येणार असून, 2 ऑक्टोबरला जन सूरज पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
केवळ जातवार जनगणना करून गरिबी दूर होणार नाही -
जातवार जनगणनेच्या मागणीसंदर्भात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही?" एवढेच नाही तर, "देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" असा सवालही यावेळी प्रशांत किशोर यांनी केला.