Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत! पुढचे ७२ तास पटना सोडू नका; नितीशकुमारांचे आमदारांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 01:39 PM2022-05-23T13:39:47+5:302022-05-23T13:40:08+5:30
Nitish Kumar may leave BJP support in Bihar Politics: दोन दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादवांच्या घरासह १५ ठिकाण्यांवर सीबीआयने छापे मारले होते. त्यानंतर बिहारमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
बिहारच्या राजकारणात मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत असून मुख्यमंत्री नितीशकुमारांनी पुढचे ७२ तास पटना सोडू नका असे आदेश जदयूच्या आमदारांना, नेत्यांना दिले आहेत. दुसरीकडे राजदने भाजपाविरोधात बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादवांच्या घरासह १५ ठिकाण्यांवर सीबीआयने छापे मारले होते. पंधरा वर्षांपूर्वीचा रेल्वे भरती घोटाळ्यावर हे छापे होते. लालू यांनी जमिनीच्या बदल्यात अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे भाजपापासून नाराज चाललेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाचे वाहन बदलण्याचे ठरविल्याचे दिसत आहे.
गेल्या वेळी नितीशकुमार यांनी राजदसोबत हातमिळवणी करत सत्ता राखली होती. परंतू काही महिन्यांतच लालू यांचे दोन्ही सुपूत्र डोईजड ठरू लागल्याने नितीश यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सत्ता राखली होती. पुढची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपासोबतच लढविली. परंतू नितीशकुमारांना त्याचा मोठा फटका बसला आणि जागा कमी झाल्या. तरीदेखील भाजपाने त्यांना शब्द दिलेला असे सांगत नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद सोडत आपल्य़ा पदरात महत्वाची खाती पाडून घेतली होती.
परंतू, आता नितीश आणि भाजपात बिनसले असून कोणत्याही क्षणी बंड होण्याची शक्यता आहे. यामुळे नितीशकुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून जदयूच्या नेत्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. यानंतर आज त्यांनी पुढचे ७२ तास आमदारांनी राजधानी पटना सोडून कुठेही जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. नितीश कुमार भाजपाची साथ सोडून राजदसोबत पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी नितीश कुमार यांनी मंत्री, आमदार, माजी आमदार, खासदार आदींशी बैठका केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे नितीशकुमार राजदच्या इफ्तार पार्टीला गेले होते. तर तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला आले होते. यामुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.