'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:41 AM2022-01-10T11:41:32+5:302022-01-10T11:42:13+5:30
सोनिया गांधी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा लालू प्रसाद यादव यांना दिला सल्ला.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी बिहारच्या पहिल्या माजी महिला मुख्यमंत्री (Former Bihar CM) राबडी देवी (Rabri Devi) यांच्या अपमानाबद्दल खेद व्यक्त केला. महाराष्ट्रातील भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या प्रभारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना 'मराठी राबडी देवी' असे संबोधले. परंतु त्याचा 'अपमान' किंवा 'अपशब्द' मानून त्या ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई केली, तर आरजेडीला काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारकडे आपला विरोध दर्शवायला हवा, असं त्यांनी निवेदन जारी करत म्हटलं.
बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव हा काही असंसदीय शब्द आहे का? असा सवालही सुशीलकुमार मोदी यांनी केला. महाराष्ट्र पोलीस राबडी देवी यांना सन्मानित महिला मानत नाहीत का, ज्यांची तुलना मराठीशी करता येईल? हे भाजपला जाणून घ्यायचं आहे. सुशांतसिंह राजपुतच्या प्रकरणावर पांघरूण घालणाऱ्या आणि महिन्याला १०० कोटी रुपयांच्या अवैध वसूलीचे डाग लागलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडून राबडी देवी यांचा अपमान केला जात असल्याचंही ते म्हणाले.
सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोलावं
राबडी देवी यांच्याशी भाजपचे राजकीय मतभेद असू शकतात आणि त्यांनी बिहारच्या राज्यपालांबद्दल काही शब्दांचा वापर केला असला तरी आमचा पक्ष नेहमीच राबडी देवी यांचा आदर करतो. तुमच्यात हिम्मत असेल तर लालूप्रसाद यादव यांनी सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर बोलावे. आरजेडी विनाकारण भाजपला लक्ष्य करत आहे, असंही ते म्हणाले.
लालू प्रसाद याव हे चारा घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्यानंतर राबडी देनी या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. लालू प्रसाद यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून टीकाही झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्यांची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्यांला सोडण्यात आलं. गजारिया यांनी ट्वीटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.