Bihar Politics: जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव! महाआघाडीत सहभागी झालेले हे छोटे पक्ष करतायत मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:15 PM2022-10-07T17:15:43+5:302022-10-07T17:25:19+5:30
Bihar Politics Tension : ...यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले.
बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेले छोटे पक्ष आता एका समन्वय समितीची मागणी करताना दिसत आहेत. यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. नुकतेच तत्कालीन कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा, त्यांचे वडील तथा आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आणि जेडीयूतील नाराजीनंतर अशा प्रकारची समिती असावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
खरे तर, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नुकतेच, 2023 पर्यंत तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, अशा आशचे वक्तव्य केले होते. यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले. सत्ताधारी महाआघाढीतील जेडीयू आणि आरजेडी या दोन सर्वात मोठ्या घटक पक्षांत तणाव निर्माण झाल्याने सरकारमध्ये सहभागी असलेल्या छोट्या पक्षांनी सरकारचे कामकाज सुरळितपणे चालावे यासाठी एक समन्वय समिती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दोन महिन्यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडले आहेत नितीश -
मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडले आणि बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव पुढील वर्षापर्यंत मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केल्यानंतर, सात पक्षांच्या या महाआघाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.