रेल्वेचा भीषण अपघात, २१ डब्बे घसरले, ६ मृत्यू १०० जखमी; रेल्वेमंत्री मध्यरात्रीच घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:32 AM2023-10-12T08:32:49+5:302023-10-12T08:36:12+5:30
आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले.
Bihar Railway Derail: आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या (१२५०६) नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरजवळ रुळावरून घसरले. या अपघातात अनेक ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी अपडेट माहितीही शेअर केली आहे.
आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे तब्बल २१ डबे बुधवारी रात्री ९.३५ वाजता दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरले. या अपघाताचे वृत्त कळताच वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनीही तात्काळ यंत्रणा कामाला लावली. तसेच, स्वत:ही घटनास्थळाचा दौरा केला. या अपघातानंतर ट्रेनमधील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने पुढे पाठविण्यात आले आहे. तर, पुढील काही वेळातच हा रेल्वेमार्ग सुरळीत होईल, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
Train to ferry passengers for onward journey reached. Should start in a few minutes.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 11, 2023
Now focusing on restoration.
रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाप्रती रेल्वेमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, घटनेची सखोल तपासणी करण्यात येईल, असेही म्हटले.
बिहार SDRF की टीम तत्परता से राहत व बचाव कार्यों में जुटी है।-#TrainAccidentpic.twitter.com/gTGaqO6sbX
— Office of Tejashwi Yadav (@TejashwiOffice) October 11, 2023
दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्विटरवरुन रेल्वे दुर्घटनेची माहिती देताना मदत व बचावकार्य वेगात सुरू असल्याचे सांगितले. तसेच, SDRF पथक घटनास्थळी पोहोचले असून वेगाने मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी, त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओही रात्रीच शेअर केले आहेत.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, एसी बोगीतील सर्व प्रवासी जवळपास झोपले होते, तेव्हा अचानक ट्रेनला धक्का लागला. प्रत्येकजण आपापल्या जागेवरुन खाली पडू लागला. सुमारे १० ते १५ मिनिटे ट्रेनमध्ये जोरदार हादरे बसले. कोणाला काही समजेपर्यंत ट्रेनच्या सर्व २१ बोगी रुळावरून घसरल्या होत्या. दोन बोगी उलटल्या होत्या.