...म्हणून कांद्याचा हार घालून आमदार पोहोचले थेट विधानसभेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:06 PM2019-11-27T16:06:37+5:302019-11-27T16:09:20+5:30
अनेक नेतेमंडळी कांद्याच्या दरवाढीला विरोध करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत.
बिहार : सध्या देशात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. स्थानिक भाजी मार्केटमध्ये 100 रुपये प्रति किलो दराने कांदा विकला जात आहे. काद्यांच्या वाढत्या किमतीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. तसेच, अनेक नेतेमंडळी कांद्याच्या दरवाढीला विरोध करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत. यातच राष्ट्रीय जनता दलाचे आमदार शिवचंद्र राम यांनी कांद्याने गुंफलेल्या हार घालून बिहार विधानसभेत दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कांदा दरवाढीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काद्यांचा हार घालून आल्याचे शिवचंद्र राम यांनी सांगितले.
बिहार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी शिवचंद्र राम यांनी आपल्या गळ्यात काद्यांचा हार घालून वाढत्या महागाईचा विरोध केला. तसेच, यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवचंद्र राम म्हणाले, "कांदा सर्वांच्या जेवणाच्या थाळीतून गायब झाला आहे. नितीश कुमार आणि कृषीमंत्री (प्रेम कुमार) कृषी रोडमॅपवरून भाषण करतात. कृषी रोडमॅपच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले. तरीही कांद्याच्या किंमती वाढल्या." याचबरोबर, काद्यांचा हार घालून विधानसभेत गेल्यावरच मुख्यमंत्री आम्हाला पाहतील आणि आम्ही कशाप्रकारे कांदा दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे, ते त्यांना सांगू, असेही शिवचंद्र राम यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी पटनामध्ये 80 रुपये प्रति किलो कांदा विकला जात आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, आधी एक-दोन दिवसात 30-50 किलो कांदा विकाला जात होता. मात्र सध्या त्यांना 10 किलो कांदा विकणे कठीण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत कांद्याची किंमत 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, कांदा व्यापाऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत कांद्याच्या दरात घट होणार नसल्याची शक्यता वर्तविली आहे.