Video : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:57 AM2023-06-05T07:57:44+5:302023-06-05T07:58:34+5:30
बिहार सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यापूर्वीही वादळामुळे या ब्रिजचा काही भाग कोसळला होता.
बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येत असलेला पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. २०१४ मध्ये सीएम नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. पूल कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुलाच्या एका पिलरचे ३० हून अधिक स्लॅब गंगा नदीत पडत असल्याचे दिसत आहे. हा पूल उभारण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे देण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२२ रोजी या पुलाच्या पिअर क्रमांक ४०५ आणि ६ मधील सुपर स्ट्रक्चर वाऱ्याच्या वेगाने कोसळलं होतं. त्यावेळीही या पुलाच्या बांधकामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
चार लेनचा पूल
मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंज ते खगरिया दरम्यान बांधण्यात येत असलेला हा पूल चौपदरी होता. बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत कोसळले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुलाचा काही भाग नदीत कोसळल्याचं पाहून घटनास्थळापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, याबाबत चौकशीचे आगेश देण्यात आले असल्याची माहिती बिहार सरकारनं दिली. तपासादरम्यान पूल कोसळण्याच्या कारणांची माहिती घेतली जाईल, तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं बिहार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
यापूर्वीही प्रश्नचिन्ह
"हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही २०२२ मध्ये वादळामुळे पुलाच्या वरचा भाग कोसळला होता. त्यावेळी विरोधात असूनही आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. सरकारकडून आयआयटी रुरकीला तपास सोपवण्यात आला होता, ज्यांच्या रिपोर्टमध्ये अनेक बाबींचा उल्लेख होता. पुलच्या डिझाईनबाबत आम्हाला आधीच आमच्या मनात शंका होती," अशी प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.
#WATCH | Visuals of the under construction bridge that collapsed yesterday into a river in Bihar's Bhagalpur for the second time pic.twitter.com/qhcfGG40pB
— ANI (@ANI) June 5, 2023
भाजपचाही निशाणा
या घटनेवरून भाजपनं मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधत यात भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. "या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २०१४ मध्ये याची उभारणी सुरू करण्यात आली. याच्या खर्चात सातत्यानं वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी वादळामुळे याचा भाग कोसळला होता. यावेळी कोणत्यातरी वाहनामुळे हा ब्रिज कोसळला. यावरून यात भ्रष्टाचार, चोरी आणि कमीशनखोरी झाल्याचं स्पष्ट होतंय. याचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. नीतीश कुमार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी," असं म्हणत भाजपनं जोरदार निशाणा साधलाय.