दिवसा कोरोना जागृती, रात्री दारूची तस्करी; भाजप कार्यकर्ते वापरत असलेली गाडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:59 AM2021-05-06T10:59:51+5:302021-05-06T11:00:25+5:30
कोरोना जनजागृतीच्या कामासाठी भाजपकडून वापरलं जाणारं वाहन पोलिसांकडून जप्त
समस्तीपूर: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती करण्याचं काम सुरू आहे. बिहारच्या समस्तीपूरमधल्या मोहिमउद्दीननगर येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एका भाड्याच्या गाडीतून कोरोनाबद्दल जनजागृतीचं काम करायचे. मंगळवारी रात्री पोलिसांनी याच गाडीतून दारू जप्त केली आहे. ही गाडी हनुमाननगरहून आरबीएस महाविद्यालयाकडे जात असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५० कार्टन विदेशी मद्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी गाडी मालकाला अटक केली आहे.
हनुमान नगरात राहणाऱ्या सुरेंद्र कुमार राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी सुरेंद्र कुमारच गाडी चालवत होता. तोच गाडीचा मालक आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे. रात्री गाडीतून तस्कर दारू उतरवत असताना गस्तीवर असणारं पोलीस पथक तिथे पोहोचलं. पोलिसांना पाहताच तस्कर पळून गेले. मात्र चालक सुंरेंद्र कुमारला पोलिसांनी अटक केली. 'मी रात्री घरी झोपलो होतो. त्यावेळी हनुमाननगरमध्ये राहणारे अमरजीत कुमार, राकेश कुमार राऊत यांच्यासह चार जण माझ्या घरी आले. भुसा आणायचा असल्याचं सांगून ते मला घरातून घेऊन गेले. त्यांनी जबरदस्तीनं माझ्या गाडीत दारू ठेवली,' असं सुरेंद्र कुमारनं पोलिसांना सांगितलं.
माझ्यासोबत गाडीत असलेले लोक ठरलेल्या ठिकाणीच दारू उतरवत होते. पण तितक्यात तिथे पोलीस आले. त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला, अशी माहिती कुमारनं पोलिसांना दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा वापर दोन दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते या गाडीचा वापर करत आहेत. त्यामुळे गाडी ताब्यात घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेच दारू तस्करी करत असल्याचा लोकांचा समज झाला. या गाडीवर भाजपचा बॅनर असल्यानं पोलिसांकडून कारवाई होणार नाही, हा विचार करून तस्करांनी गाडीचा वापर दारूच्या तस्करीसाठी केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.