भयंकर! बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; जलाभिषेकावेळी धक्काबुक्की, 2 महिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:21 PM2022-07-18T12:21:06+5:302022-07-18T12:27:12+5:30
Baba Mahendranath Dham Temple : श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात (Baba Mahendranath Dham Temple) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बंद होते. त्यानंतर आता पहिल्याच सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सिसवन ब्लॉकमधील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात जलाभिषेकादरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. जलाभिषेक करताना धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर मात्र, मंदिर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती.
विशेषत: महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जलाभिषेकादरम्यान धक्काबुक्की झाल्याने गर्दीमध्ये असेलल्या काही महिला जमिनीवर पडल्या. त्यांना उठवण्याचीही संधी मिळाली नाही. यामध्ये प्रतापपुर गावच्या लीलावती देवी (42 वर्ष) व पाथर गावच्या सुहागमती देवी (40) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहदुल्लेपूर गावच्या शिवकुमारी देवी आणि प्रतापपुरच्या अंजुरिया देवी या दोघी जखमी झाल्या आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर बाबा महेंद्रनाथ धाम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाचं संकट असल्याने हे मंदिर बंद होते. पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिर खुले करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.