बिहारमध्ये माती घोटाळा? लालूंच्या मुलावर आरोप
By admin | Published: April 4, 2017 08:44 PM2017-04-04T20:44:55+5:302017-04-04T20:44:55+5:30
एकेकाळी चारा घोटाळ्यामुळे गाजलेल्या बिहारमध्ये आता माती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात
Next
ऑनलाइन लोकमत
पटना, दि. ४ - एकेकाळी चारा घोटाळ्यामुळे गाजलेल्या बिहारमध्ये आता माती घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा हात असल्याचा आरोप होत असून, राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी ९० लाख रुपयांच्या या कथित घोटाळ्या प्रकरणी पर्यावरण मंत्री
तेजप्रताप यादव यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याकडे केली आहे.
आज झालेल्या जनता दरभारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशीलकुमार मोदी यांनी ही मागणी केली. सुशिलकुमार मोदी यांनी आरोप केला की, संजय गांधी जैविक उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली ९० लाख रुपयांची माती खरेदी करून पाऊलवाट तयार करण्याचे काम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता रूपसपूर येथील एमअस इंटरप्रायझेसच्या वीरेंद्र यादव यांना देण्यात आले.
तेजप्रताप यांनी आपल्या एका कंपनीकडून पटण्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या शॉपिंग मॉलच्या दोन अंडर ग्राऊंड फ्लोअरमधील माती आपल्याच मंत्रालयाला विकून ९० लाख रुपयांची कमाई केल्याचा आरोप करत मोदी यांनी कुठलाही मंत्री आपल्याच जमिनीतील माती आपल्या मंत्रालयाकडून कशी काय खरेदी करू शकतो, असा सवाल केला. तसेच या कंपनीत तेजप्रताप हे निर्देशक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रात्री १० ते ५ यावेळेत मातीची वाहतूक केली जात आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या उद्यानात रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे काम करण्यास मनाई असल्याचा आरोप मोदी यांनी केला.