Video - संतापजनक! वर्गात शिक्षिका काढतेय झोपा अन् विद्यार्थिनीला घालायला लावला वारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:24 AM2022-06-08T08:24:09+5:302022-06-08T08:26:27+5:30
जर आपल्या देशात अशी व्यवस्था असेल तर देशाच्या भविष्याचं काय होईल? असा प्रश्नही नक्की पडेल.
नवी दिल्ली - बिहारच्या बेतियामधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे सरकारी यंत्रणा आणि आपल्या व्यवस्थेला जोरदार चपराक आहे. व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. जर आपल्या देशात अशी व्यवस्था असेल तर देशाच्या भविष्याचं काय होईल? असा प्रश्नही नक्की पडेल.
सरकारची एक घोषणा आहे जी तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. ती म्हणजे "पढ़ेगा भारत तो बढ़ेगा भारत" पण तूर्तास अभ्यास सोडा आणि शिकवणाऱ्यांची चिंता करा. सरकारी शाळांमध्ये शिकवणारे काही शिक्षक पूर्णपणे बेफिकीर होत आहेत. त्यांचा निष्काळजीपणा दाखवणारा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमधील बेतिया येथून व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात एक महिला शिक्षिका झोपलेली दिसत आहे.
शिक्षिका वर्गात सर्व विद्यार्थ्यासमोर झोपत आहेत. विद्यार्थी उपस्थित असताना त्यांना शिकवायचं सोडून त्यांनी हा अजब प्रकार केला आहे. त्यांचं झोपेवर अधिक प्रेम असलेलं दिसून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्या झोपलेल्या असताना एक विद्यार्थिनी त्यांना हवा घालताना दिसत आहे. त्यांचा हा झोपलेला व्हिडीओ कोणीतरी गुपचूप काढला आणि आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर baatbiharki नावाने हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "बिहारमधील मुलांचे भविष्य अंधारात टाकून शांत झोपलेले शिक्षक" असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. यावर एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, 'शिकवायला खूप मेहनत घ्यावी लागते.' दुसऱ्या युजरने म्हटलं, 'सरकारचे लक्ष कुठे आहे हे मला माहीत नाही.' हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.