बिहारमध्येही काँग्रेसमध्ये संकट : १८ आमदार निघाले होते नितीश यांच्यामागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:47 AM2017-09-01T02:47:52+5:302017-09-01T02:47:55+5:30
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दहा कलमी मागण्यांचे पत्रही दिले आहे. वीरभद्र सिंह यांच्या आग्रही भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकांआधीच काँग्रेसपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे बिहारमधील काँग्रेसमध्येही पेचप्रसंग निर्माण
झाला आहे. अर्थात तो दूर करण्यात काँग्रेस श्रेष्ठींना तूर्त तरी यश आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वीरभद्र सिंह दिल्लीत आहेत. त्यांनी बुधवारी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटवून त्यांच्या जागी आशा कुमारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच निवडणुकीत मुक्त हस्त द्यावा, अशा मागण्यांसह त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका पत्रात मांडली आहेत.
काँग्रेसने मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वीरभद्र सिंह यांच्या या पत्राबाबत कल्पना नसल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. सुखविंदर सिंह सुखू यांची नियुक्ती राहुल गांधी गटाने केली असल्याने प्रदेशाध्यक्ष सुखविंदर यांना हटविण्याच्या निर्णयाला त्यांची मंजुरी घ्यावी लागेल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, बिहारमधील काँग्रेसमधील राजकीय संकट दूर करण्यात पक्षाच्या श्रेष्ठींना तात्पुरतेच यश आले आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी व बिहार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनी पक्ष सोडून नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची भाषा सुरू केली असल्याचे पत्र तीन आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविले होते.
दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी हे पत्र तयार केले असून, त्यावर ते आमदारांच्या सह्या घेत आहेत आणि आतापर्यंत १४ आमदारांच्या सह्याही घेतल्या आहेत. आता दोनतृ्तीयांश आमदारांच्या सह्या झाल्या असून, आणखी चार आमदारांच्या सह्या होणे बाकी आहे, अशी माहितीही तीन आमदारांनी सोनिया गांधी यांना दिली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी चौधरी व सिंह यांना लगेच दिल्लीत बोलावून समज दिली. त्या वेळी अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, पी. सी. जोशी हेही उपस्थित होते.
२७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा
मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी आपणास २७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
केला आहे. तसेच विधानसभेची आगामी निवडणूक न लढविण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाने दखल देऊन मार्ग काढावा, असे त्यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हीही निवडणूक लढविणार नाही, असे म्हटले आहे.
किती काळ शांतता? : त्यानंतर अशोक चौधरी व सदानंद सिंह यांनी आम्ही पक्ष सोडणार नाही आणि सर्व आमदारांनाही तसे समजावू, असे आश्वासन सोनिया गांधी यांना दिल्याचे समजते. त्यामुळे बिहार काँग्रेसमधील संकट तूर्त थांबले आहे, असे दिसते. मात्र अशी स्थिती किती काळ राहील, हे सांगणे अवघड आहे.