५ वर्षात बिहारला केंद्राकडून ३.७४ लाख कोटी रुपये मिळणार - मोदी
By Admin | Published: September 1, 2015 03:05 PM2015-09-01T15:05:41+5:302015-09-02T00:12:56+5:30
आगामी पाच वर्षात केंद्र सरकारकडून बिहारला ३.७४ लाख कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
भागलपूर, दि. १ - बिहारला पावणे दोन लाख कोटी रुपयांचे पॅकेजनंतर आता बिहारवर मोदी सरकारने पुन्हा एकदा कृपादृष्टी दाखवली असून आगामी पाच वर्षात केंद्र सरकारकडून बिहारला ३.७४ लाख कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या महापुरुषांना तिलांजली देणा-या बिहारमधील सत्ताधा-यांना आता जनतेनेही तिलांजली द्यावी असे मोदींनी म्हटले आहे.
मंगळवारी बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी महाआघाडीवर जोरदार टीका केली. राममनोहर लोहिया यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधात लढा दिला, पण आता त्यांचेच समर्थक सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेससोबत बसतात असे सांगत मोदींनी लालूप्रसाद यादव व नितीशकुमारांवर निशाणा साधला. बिहारमधील कितीही राजकीय पक्षांनी एकत्र यावे पण आता बिहारमधील जनता फक्त विकासासाठीच मत देणार असे मोदींनी स्पष्ट केले. गेली २५ वर्ष बिहारमध्ये राज्य करणा-या मंडळींनी आधी त्यांच्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा, पण दुर्दैवाने ही लोकं माझ्या कामाचा हिशोब मागतात, मी माझ्या कामाचा हिशोब २०१९ च्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये देईन असेही त्यांनी नमूद केले.