JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 09:19 PM2023-07-06T21:19:45+5:302023-07-06T21:27:15+5:30
...यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे.
राज्यसभेचे उपसभापती आणि जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह पाटण्यात आले आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन दिल्लीला निघून गेले. यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. यासंदर्भात, महाआघाडीतील बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना प्रश्न विचारला असता, नितीश कुमार कुठेही जात नाहीत. भाजप हळूहळू कमकुवत होत चालला आहे आणि संपेल, असे ते म्हणाले.
गेल्या वर्षभरापासूनच जेडीयूमध्ये फूट पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र अद्याप असे काहीही झालेले नाही. ऑगस्ट 2022 मध्ये आरसीपी सिंह यांनी जेडीयूला राम राम ठोकला, तेव्हा वाटत होते की, जेडीयूतील काही लोक त्यांच्यासोबत जातील. मात्र कुणीही मोठा नेता त्यांच्यासोबत गेला नाही. तेव्हापासूनच जेडीयूमध्ये फूट पडण्याचे दावे केले जात आहेत.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी जेडीयूने बहिष्कार टाकला होता. मात्र, घटनात्मक पदावर असल्याने समारंभाला उपस्थित राहिलेले हरिवंश काही दिवसांपासून भाजपकडे झुकल्याचे मानले जात होते. यामुळे हरिवंश जेव्हा नितीश यांना भेटण्यासाठी पाटण्याला पोहोचले तेव्हा त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप नितीश कुमारांसाठी आणल्याची चर्चा रंगली होती. मात्र जेडीयूने ही चर्चा फेटाळून लावत, नितीश पक्षाच्या आमदार आणि खासदारांना एक-एक करून भेटत आहेत आणि त्याच संदर्भात हरिवंशही त्यांना भेटायला आले, असे म्हटले होते.
तसेच, जेडीयू नेत्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्यासंदर्भात विचारले असता, या हवेतील गप्पा आहेत. नितीश कुमार भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी विरोधकांना एकत्र करत आहेत, असे म्हटले होते.