बिहारमधील डाव उधळणार - हार्दिक
By admin | Published: September 19, 2015 02:03 AM2015-09-19T02:03:03+5:302015-09-19T02:03:03+5:30
गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचे आंदोलन उभे करून रथीमहारथींची झोप उडविणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आता बिहारमध्ये डाव उधळण्याची धमकी दिली आहे. भारतीय
अहमदाबाद : गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचे आंदोलन उभे करून रथीमहारथींची झोप उडविणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आता बिहारमध्ये डाव उधळण्याची धमकी दिली आहे. भारतीय जनता पार्टीवर पटेलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप करून बिहारमध्ये चार सभा घेण्याची घोषणा हार्दिक यांनी शुक्रवारी येथे केली. बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.
हार्दिक यांनी येथे बोलताना सांगितले की, आम्ही पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सर्व १९७ समन्वयकांसोबत बिहारमधील जनसभांबाबत सविस्तर चर्चा करू. याशिवाय मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पटेल नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या सभा यशस्वी करण्यासाठी तेथे पोहोचतील. हार्दिक पटेल यांनी आपल्या समुदायाच्या लोकांना ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन छेडले आहे.
गेल्या २५ आॅगस्टच्या विशाल सभेत अत्यंत आक्रमक भाषण करून त्यांनी संपूर्ण देश ढवळून काढला होता. त्यानंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. हार्दिक यांनी नितीशकुमार हे आमच्या समुदायाचे सदस्य असल्याचे सांगितले होते. यावर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांची प्रशंसा केली होती.