हृदयद्रावक! रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉक लागला; आई-बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:31 IST2022-05-10T18:30:11+5:302022-05-10T18:31:21+5:30
वडिलांनी शेजारी पडलेल्या बांबूच्या साहाय्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला तर आई देखील त्याला पाण्यातून ओढत रस्त्याच्या एका बाजुला नेण्याचा प्रयत्न करत होती.

हृदयद्रावक! रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉक लागला; आई-बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूरच्या स्टेशन रोडवर शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. यामधून तरुणाचे पालक थोडक्यात वाचले आहेत. हे कुटुंब दिल्लीहून हमसफर एक्स्प्रेसने मुझफ्फरपूरला परतले होते. त्यांना दरभंगा येथे जायचं होतं. रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर ते बस स्टँडकडे निघाले, मात्र रस्त्यात मधोमध पाणी भरलं होतं. तरुण पाण्यातून बाहेर येत होता. तर आई-वडील बाजूने जात होते. याच दरम्यान तरुणाला शॉक लागला.
वडिलांनी शेजारी पडलेल्या बांबूच्या साहाय्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला तर आई देखील त्याला पाण्यातून ओढत रस्त्याच्या एका बाजुला नेण्याचा प्रयत्न करत होती. कसंबसं आईने आपल्या मुलाला पाण्यातून बाहेर काढलं. यावेळी शेजारी उभे असलेले लोक फक्त पाहत राहिले. त्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्टेशनसह अनेक भागात बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे स्टेशन रोडवर पाणी साचलं होतं. महापालिकेच्या स्ट्रीट लाईटची तार तुटून पडली होती. त्यातून करंट जात होता. त्याचाच शॉक तरुणाला लागला आणि त्याने आईवडिलांच्या डोळ्यादेखत जीव गमावला आहे. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.