बिहारी नाट्य सुरुच, नितीशकुमारांच्या पक्षात फूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 08:45 PM2017-08-02T20:45:56+5:302017-08-02T20:46:20+5:30
गेल्या आठवड्यात महागठबंधनमधून बाहेर पडून नितीशकुमार यांनी एनडीएच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी सुरु झालेलं बिहारी नाट्या अद्याप संपलेलं दिसत नाही
पाटणा, दि. 02 - गेल्या आठवड्यात महागठबंधनमधून बाहेर पडून नितीशकुमार यांनी एनडीएच्या पाठिंबा घेत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी सुरु झालेलं बिहारी नाट्या अद्याप संपलेलं दिसत नाही. सध्या आलेल्या वृत्तानुसार, जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव वेगळी चुल मांडण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेत जेडीयूचे माजी आमदार आणि शरद यादव यांचे निकटवर्तीय विजय वर्मा यांनी दिले आहेत.शरद यादव यांनी आपला स्वतच्या पक्षाची स्थापना केली तर बिहारमध्ये आणखी एक राजकीय भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना विजय वर्मा यांनी शरद यादव महागठबंधनमध्ये राहण्यासाठी, जेडीयूतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना करु शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. विजय वर्मा म्हणाले की, सध्या शरद यादव जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असून, बिहारमधील राजकीय परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ते सध्या नव्या पक्षाची स्थापना करण्यासाठी चाचपणी करत आहे. विशेष म्हणजे, शरद यादव यांचा धर्मनिरपेक्ष शक्तींच्या महागठबंधनामध्ये राहण्याकडे जास्त कल असल्याचा दावाही वर्मा यांनी केला आहे.
शरद यादव यांनी यासाठी काँग्रेस नेते गुलाम नबी अझाद, आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येच्युरींना भेट घेतली आहे. शिवाय, एनडीए सरकारमध्ये सहभागी होऊन, मंत्रीपदाची शपथ घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचीही माहिती दिली. पण शरद यादव कुणाच्या संपर्कात आहेत, याबाबत विचारले असता, यावर अधिक खुलासा करण्याचं वर्मा यांनी टाळलं.
दरम्यान, जेडीयूचे मुख्य महासचिव के.सी.त्यांगी या वृत्ताचं खंडण करुन, या सर्व अफवाह असल्याचं सांगितलं आहे. तर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी शरद यादव नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.