बिहारचा पूल पडला नाही आम्ही पाडला; तेजस्वी यादव आले नितीशकुमारांच्या मदतीला धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:57 AM2023-06-05T09:57:26+5:302023-06-05T10:02:16+5:30
गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. तेव्हा तेजस्वी यादव विरोधी पक्षनेते होते. आता सत्तेत बसलेत.
पटना: बिहारच्या भागलपूरमध्ये १७०० कोटी रुपयांच्या खर्चाचा नदीवर बनविला जात असलेल्या पुलाचा एक भाग रविवारी सायंकाळी कोसळला. गेल्या वर्षी देखील याच पुलाचा काही भाग वादळामुळे कोसळला होता. तेव्हा देशभरात नाचक्की झाली होती. आताही तसेच होऊ नये म्हणून बिहार सरकारने सुरुवातीला चौकशीचे आदेश दिले होते, परंतू आता तो पूल आम्हीच पाडला असल्याचा दावा बिहार सरकार करत आहे.
पूल कोसळल्याने बिहारमध्ये पुन्हा एकदा विरोधक टीका करू लागले आहेत. यावर तेव्हाचे विरोधी पक्षनेते आणि आता नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले तेजस्वी यादव धावून आले आहेत. जेव्हा वादळामुळे पूल कोसळलेला तेव्हा मीच आवाज उठविलेला. आता सत्तेत आल्यावर आम्ही आयआयटी रुडकीला याची चौकशी करायला सांगितली होती. त्यांचा अहवाल येत आहे. त्यापूर्वी त्यांनी या पूलाच्या निर्माणामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे या पुलाचा भाग पाडण्यात आला आहे, असे यादव म्हणाले.
नितीश सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्याचे पाहून तेजस्वी याजव आणि रस्ते निर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्यमंसचिव प्रत्यय अमृत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सारवासारव केली आहे. गेल्या वर्षी ३० एप्रिलला या पुलाचा एक हिस्सा कोसळला होता. ही घटना खूप चर्चेत आली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेता या नात्याने मी तो मुद्दा जोरदारपणे मांडला होता. सत्तेत आल्यावर आम्ही चौकशीचे आदेश दिले आणि तज्ज्ञांचे मत मागवले. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे पुलाचा काही भाग पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यादव म्हणाले.
#WATCH | After the bridge collapse, a person working as a guard with SP Singla Company is said to be missing. His body has not been recovered yet. Search by SDRF & NDRF teams is underway to trace him: Chandan Kumar, Circle Officer, Parbatta, Bihar https://t.co/sAepXdPg5Gpic.twitter.com/rMbrDQO6ss
— ANI (@ANI) June 5, 2023
रविवारी पुलाचा काही भाग पाडणे हा या कवायतीचा एक भाग होता, असे प्रत्यय यांनी सांगितले. अंतिम अहवाल आल्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहे. यासोबतच एफआयआर नोंदवण्याची कारवाईही केली जाणार आहे, असे ते म्हणाले.