बिहारमध्ये दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बार

By admin | Published: September 10, 2015 04:50 AM2015-09-10T04:50:17+5:302015-09-10T04:50:17+5:30

बिहार विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी पाच टप्प्यांत पार पाडली जाणार असून, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने नवे सरकार ऐन दिवाळीत सत्तेवर येईल.

Bihar's election time before Diwali | बिहारमध्ये दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बार

बिहारमध्ये दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बार

Next

नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी पाच टप्प्यांत पार पाडली जाणार असून, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने नवे सरकार ऐन दिवाळीत सत्तेवर येईल. २४३ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १२ आॅक्टोबर रोजी सुरू होणार असून, अंतिम टप्पा ५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल.
१२ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, २८ आॅक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत जाहीर केले. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार असल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. दसरा, ईद, मोहरम, छटपूजा निवडणूक निकालाला लागूनच दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण या काळात असल्यामुळे त्यांनी जातीय सलोखा आणि शांतता राखण्याची खबरदारी आयोग घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासोबत आयुक्त अचलकुमार ज्योती आणि ओमप्रकाश रावत हे होते. बिहारमध्ये ४७ मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे पुरेसा सुरक्षा बंदोबस्त ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
साऱ्या देशाचे लक्ष
भाजपप्रणित रालोआ आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष महायुती यांच्यातील काट्याच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले राहील. काँग्रेसने यावेळी प्रथमच लालूप्रसाद यादव यांच्या राजदसह जेडीयूसोबत हातमिळविणी केली आहे. दुसरीकडे रालोआला पासवानांचा लोकजनशक्ती, माझी मुख्यमंत्री जितीन मांझी यांच्या गटाची साथ लाभली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेत नितीशकुमार यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकल्यामुळे राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक दोन्ही आघाड्यांनी प्रतिष्ठेची बनविल्यामुळे जय-पराजयाचे श्रेय- अपश्रेय हाही निवडणुकीनंतर गाजणारा मुद्दा ठरू शकतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर या निमित्ताने मोदींची कसोटी लागणार आहे. भूंपादन विधेयकावर घ्यावी लागलेली माघार, जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेले अपयश या सर्वांवर मात करतानाच मोदी सरकारची गतिशीलता कायम राखण्यासाठी भाजपला कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

यंत्रांवर उमेदवारांचे फोटो
बिहारमधील ६.६८ कोटी मतदार ६२,७७९ मतदान केंद्रांवर मतदानाचा अधिकार बजावतील. यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनवर उमेदवारांचे फोटो लागलेले राहतील.

नितीश, लालू म्हणतात आमची ‘जय्यत तयारी’
आम्ही निवडणुकीची चांगली तयारी केली आहे, असे सांगत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी निवडणूक कार्यक्रमाचे स्वागत केले. आचारसंहिता लागू होत असल्याने निवडणुकीसंबंधी कोणतेही कामकाज केले जाणार नाही; केवळ अत्यावश्यक कार्यालयीन कामे पार पाडली जातील, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. पाच टप्प्यांत निवडणुका घेण्याऐवजी एकाच दिवशी पार पाडल्या असत्या तर चांगले झाले असते, असे लालूप्रसाद यांनी म्हटले. ही केवळ बिहारची नव्हे तर संपूर्ण देशाची निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.

निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ही नितीशकुमार राजवटीचा शेवट झाल्याची घोषणा आहे. आता प्रतीक्षा संपली असून, भाजपा सत्तेवर येत असल्याची ही घोषणा आहे.
-शाहनवाज हुसैन, प्रवक्ते, भाजपा

दिवाळीपूर्वी निकाल होणार ही आनंदाची गोष्ट आहे. बिहारची जनता लोक चांगल्या प्रशासनाबाबत आश्वस्त होऊन दिवाळी साजरी करतील.
- रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

Web Title: Bihar's election time before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.