बिहारमध्ये दारु सोडा, दूध विका
By Admin | Published: December 21, 2015 01:48 PM2015-12-21T13:48:37+5:302015-12-21T14:08:14+5:30
बिहारमध्ये दारुबंदी अंमलात आल्यानंतर येथे मद्यविक्रीची दुकाने बंद होऊन, या दुकानांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २१ - बिहारमध्ये दारुबंदी अंमलात आल्यानंतर येथे मद्यविक्रीची दुकाने बंद होऊन, या दुकानांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या समस्येवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक चांगली अभिनव कल्पना सुचवली आहे.
बिहारमध्ये मद्यविक्री करणा-या दुकानांना नितीश कुमार यांनी दुधाची उत्पादने विकण्याचा पर्याय सुचवला आहे. राज्य सरकारच्या सुधा ब्रॅण्डच्या दुग्ध उत्पादनांची विक्री केली तर, सरकारलाही फायदा होईल आणि रोजगारही टिकून राहील असे नितीश कुमार म्हणाले.
बिहारमध्ये मद्याची जवळपास ६ हजार दुकाने आहेत. नितीश कुमार बिहारमध्ये दारुबंदी लागू करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी निवडणूक काळात महिलांना दारुबंदीचे आश्वासन दिले होते. बिहारमध्ये टप्याप्यामध्ये दारुबंदी अंमलात येणार आहे.
पहिल्या टप्यात देशी दारुवर बंदी घालण्यात येईल. पहिल्या टप्यातील बंदी लागू झाल्यानंतर राज्यसरकारला तीन ते साडेतीन हजार कोटीच्या महसूलावर पाणी सोडावे लागेल.१ एप्रिल २०१६ पासून ही बंदी अंमलात येणार आहे.